आयपीएलमधील सर्वात दमदार संघ कुठला असे विचारल्यावर काही चाहते मुंबई इंडियन्सचे नाव घेतात. पण स्पर्धेतील सर्वात स्फोटक फलंदाजी असलेला संघ कोणता या प्रश्नाचं उत्तर सनरायजर्स हैदराबाद असंच मिळेल.
गेल्या २ हंगामापासून २००चा आकडा गाठणे हा काव्या मारनच्या SRH संघासाठी नित्यक्रमच असल्यासारखे आहे. अभिषेक शर्मा, ट्रेव्हिस हेड, इशान किशन, हेनरिक क्लासेन यांच्यापुढे गोलंदाजांचा निभाव लागणे कठीण होऊन बसले आहे.
गेल्या सामन्यात हैदराबादने २४७ धावांचे आव्हान ९ चेंडू राखून पार केले. एवढी तगडी फलंदाजी असताना त्यांच्या ताफ्यात एक नवीन बिगहिटरही सामील झाला आहे. द्विशतक ठोकणाऱ्या २१ वर्षीय रविचंद्रन स्मरणने SRH ने संघात घेतले आहे.
आणखी एक तगडा खेळाडू संघात येणे ही आनंदाची बाब असली, तरीही २५ दिवसांपूर्वी करण्यात आलेली एक भविष्यवाणी सध्या चर्चेत आहे. ही भविष्यवाणी काव्या मारनच्या चेहऱ्यावर हसू आणेल की डोळ्यात आसू आणेल हा खरा सवाल आहे.
डेल स्टेनने २३ मार्चला एक भविष्यवाणी केली होती. १७ एप्रिलला IPL मध्ये पहिल्यांदा एखादा संघ ३००चा आकडा पार करेल, असा अंदाज डेल स्टेनने व्यक्त केला होता. तसेच, हे पाहण्यासाठी तो कदाचित मुंबईतही असेल असेही लिहिले होते.
१७ एप्रिल म्हणजेच आज मुंबई इंडियन्स विरूद्ध सनरायजर्स हैदराबाद यांच्यात सामना रंगणार आहे. स्टेन याआधी हैदराबादकडून खेळलाय. तसेच SRHचे फलंदाज पाहता ३०० पारची धावसंख्या करण्याची अपेक्षा त्याच संघाकडून केली जाऊ शकते.
पण कहानी में ट्विस्ट म्हणजे, डेल स्टेनने कुठला संघ ३०० धावांचा आकडा गाठेल याबाबत काहीही लिहिलेले नाही. त्यातच SRH फटकेबाजीत दमदार असला तरीही मुंबईच्या संघातही बडे खेळाडू आहेत, जे मनात आणलं तर काहीही करू शकतात.
अशा परिस्थितीत सनरायजर्स हैदराबादच्या संघाने ३०० पार मजल मारली तर काव्या मारनच्या चेहऱ्यावर नक्कीच हसू उमलेल. पण जर मुंबईने हे आव्हान पार केले किंवा आधीच ३०० पार मजल मारली तर मात्र चाहत्यांना काव्या मारनचा निराश चेहरा पाहावा लागू शकेल.