MS Dhoni ने शेवटच्या ४ चेंडूंत ६,६,६,२ अशी फटकेबाजी करून २० धावा कुटल्या व CSK ला ४ बाद २०६ धावांपर्यंत पोहोचवले. त्याआधी कर्णधार ऋतुराज गायकवाडने ४० चेंडूंत ५ चौकार व ५ षटकारांसह ६९ धावा कुटल्या. त्याने तिसऱ्या विकेटसाठी दुबेसह ४५ चेंडूंत ९० धावांची भागीदारी केली. दुबे ३८ चेंडूंत १० चौकार व २ षटकारांसह ६६ धावांवर नाबाद राहिला.
इशान किशन आणि रोहित शर्मा यांनी मुंबईला अपेक्षित आक्रमक सुरुवात करून दिली. दोघांनी ७ षटकांत ७० धावा जोडल्या. मथिशा पथिराणाने त्याच्या पहिल्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर इशानला ( २३) माघारी पाठवून CSK ला यश मिळवून दिले. त्याच षटकात पथिराणाच्या बाऊन्सरवर सूर्यकुमार यादवने अपर कट मारला खरा, परंतु मुस्ताफिजूर रहमानने चतुराईने झेल टिपला.
पण, रोहित शर्मा मैदानावर उभा राहिला आणि त्याने या पर्वातील त्याचे पहिले अर्धशतक पूर्ण केले. आयपीएलमध्ये CSK विरुद्ध त्याने आठव्यांदा 50+ धावा केल्या. शिखर धवन, विराट कोहली व डेव्हिड वॉर्नर यांनी ( ९) सर्वाधिकवेळा हा पराक्रम केला आहे.
ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये १००० हून अधिक चौकार व ५०० हून अधिक षटकार खेचणारा रोहित शर्मा हा जगातील दुसरा फलंदाज आहे. ख्रिस गेलने ११३२ चौकार व १०५६ षटकार खेचले आहेत, तर रोहितच्या नावावर १०२५* चौकार व ५००* षटकार आहेत.
ख्रिस गेल व कॉलिन मुनरो यांच्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये १०० हून अधिक षठकार व ट्वेंटी-२०त ५०० हून अधिक षटकार खेचणारा तो तिसरा फलंदाज आहे.
ट्वेंटी-२०त सर्वाधिक ५०० षटकार खेचणारा तो आशियातील पहिला फलंदाज आहे. भारतीयांमध्येही तो अव्वल आहे आणि विराट कोहली ( ३८३), महेंद्रसिंग धोनी ( ३३१), सुरेश रैना ( ३२५) व लोकेश राहुल ( ३००) हे त्याच्या मागे आहेत.
मुंबई इंडियन्सकडून सलामीला सर्वाधिक धावा करण्याच्या २५०८ धावांचा विक्रम रोहित शर्माने नावावर केला. सचिन तेंडुलकरने २४९२ धावा केल्या आहेत. त्यानंतर इशान किशन ( १३८६), क्विंटन डी कॉक ( १३२९) व लेंडल सिमन्स ( ११७५) धावा केल्या आहेत.
ट्वेंटी-२०त सलामीला येऊन ६००० धावा करणारा रोहित तिसरा भारतीय फलंदाज ठरला. शिखर धवन ( ९३९०) व लोकेश राहुल ( ६०४७) हे त्याच्या पुढे आहेत.