मुंबई इंडियन्स वगळता इतर सर्व संघांनी किमान एक लढत जिंकली आहे. रोहित शर्माला ( Rohit Sharma) कर्णधार म्हणून हटवल्यानंतर चाहत्यांचा हार्दिकवर राग होताच. काल घरच्या मैदानावरील पहिल्याच सामन्यात मुंबईला हार पत्करावी लागल्याने चाहत्यांच्या नाराजीत भर पडली आहे.
हार्दिकने कालच्या लढतीनंतर सोशल मीडियावर चाहत्यांसाठी पोस्ट लिहीली की, हा संघ प्रयत्न करणं कधीच थांबवत नाही, हे या संघाबद्दल तुम्हाला माहित असायला हवे. आम्ही संघर्ष करत राहणार आणि पुढे वाटचाल करणार.
मुंबई इंडियन्सचा पुढील सामना ७ एप्रिलला दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध वानखेडे स्टेडियमवर होणार आहे. या सामन्यातून सूर्यकुमार यादवचे पुनरागमन होईल अशी चाहत्यांना अपेक्षा आहे.
दरम्यान, ६ दिवसांच्या ब्रेकसाठी मुंबई इंडियन्सचे खेळाडू जामनगरच्या दिशेने मंगळवारी रवाना झाले आहेत. कर्णधार हार्दिक पांड्यासह रोहित शर्मा व त्याची पत्नी रितिका सजदेहसह सर्व खेळाडू मुंबई विमानतळावर दिसले.
पण, यावेळी लक्ष वेधले ते इशान किशन, कुमार कार्तिकेय, नुवान तुषारा व सॅम्स मुलानी या चौघांनी... हे चौघे सुपरमॅनच्या अवतारात दिसले. मुंबई इंडियन्सच्या परंपरेनुसार टीम मिटिंगमध्ये उशीराने येणाऱ्या खेळाडूला शिक्षाम्हणून फ्रँचायझी जम्पसूट देतात आणि या खेळाडूंना प्रवासादरम्यान तो घालावा लागतो.