IPL 2023: विराटच्या RCB ला चॅम्पियन बनण्यापासून कायम रोखतायत 'या' 4 गोष्टी

RCBचा पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

IPL 2023 RCB out of Playoffs, Virat Kohli: IPL च्या शेवटच्या साखळी सामन्यात दोन भारतीय खेळाडूंची शतके चर्चेत राहिली. विराट कोहलीने सलग दुसऱ्या सामन्यात शतक ठोकत रॉयल चॅलेंजर्स बंगलोर RCB ला दोनशेनजीक आणले. पण शुबमन गिलनेही सलग दुसरे शतक ठोकत गुजरात टायटन्सला विजय मिळवून दिला.

RCB च्या पराभवामुळे मुंबई इंडियन्सला प्ले ऑफचे तिकीट मिळाले. RCB साठी हा सामना करो किवा मरो स्वरूपाचा होता. त्यात त्यांचा पराभव झाल्याने त्यांचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. इतकी चांगली कामगिरी करूनही RCB ला 'या' ४ गोष्टी महागात पडल्या.

1. विराट कोहलीवर जास्त अवलंबून राहणे- विराट RCBचा सर्वोत्कृष्ट खेळाडू असला, तरी त्याच्यावर अवलंबून राहणे संघाची सर्वात मोठी कमजोरी आहे. RCBची संपूर्ण रणनीती विराटभोवती फिरते. IPL सारख्या मोठ्या स्पर्धेसाठी एका महान खेळाडूची नव्हे तर 11 चॅम्पियन खेळाडूंची गरज असते. संघात चांगला समतोल राखण्याची गरज आहे आणि या हंगामात ही गोष्ट आरसीबीकडून हरवलेली दिसते.

2. चांगला भारतीय फलंदाज नाही- RCBकडे विराट कोहलीच्या रूपाने अप्रतिम फलंदाज नक्कीच आहे, पण त्याच्याशिवाय एकही भारतीय फलंदाज नाही जो स्वबळावर सामना जिंकवू शकेल. या हंगामाविषयीच बोलायचे झाले तर, अनुज रावत, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक, शाहबाज अहमद, सुयश प्रभुदेसाई असे भारतीय फलंदाज या संघात होते आणि ते सर्व फ्लॉप ठरले. त्यामुळे त्यांना परदेशी फलंदाजांवर अवलंबून राहावे लागले.

3. चांगल्या भारतीय गोलंदाजांची गरज- फलंदाजीत विराटला साथ देण्यासाठी जास्त परदेशी खेळाडू संघात घेतल्याने गोलंदाजीत आरसीबी वाइट अवस्था होते. मोहम्मद सिराजने या मोसमात 19 विकेट घेतल्या पण त्याच्या व्यतिरिक्त RCBकडे एकही भारतीय गोलंदाज नाही. हर्षल पटेलने 14 आणि कर्ण शर्माने 10 विकेट घेतल्या, परंतु त्याचा इकॉनॉमी रेट 10 षटकांच्या आसपास राहिला. परिणामी, RCB ने अनेक मोठ्या धावसंख्येचे सामने गोलंदाजीपायी गमावले.

4. फिट खेळाडूंवर लक्ष देणं आवश्यक- कोणताही खेळाडू कधीही दुखापतग्रस्त होऊ शकतो. पण चांगली तंदुरुस्ती असलेले खेळाडू संघात ठेवणं महत्त्वाचे आहे. RCBला या मोसमात आपल्या महत्त्वाच्या खेळाडूंच्या दुखापतीचा सामना करावा लागला. जोश हेझलवूड केवळ 3 सामने खेळू शकला. हसरंगाही खराब फिटनेसमुळे केवळ 8 सामनेच खेळू शकला. तर हंगामापूर्वी रजत पाटीदारला झालेल्या दुखापतीमुळेही आरसीबीचे मोठे नुकसान झाले.