पाचवेळा आयपीएलचा चषक उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सचा पहिला सामना रिषभ पंतच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध ( Delhi Capitals ) २७ मार्चला ब्रेबॉर्न स्टेडियमवर होणार आहे. पण, मुंबई इंडियन्ससह ( Mumbai Indians) तर अन्य फ्रँचायझींची डोकेदुखी वाढवणारी बातमी समोर आली आहे.
आयपीएल की राष्ट्रीय कर्तव्य असा डाव दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने खेळाडूंसमोर टाकला होता. कर्णधार डीन एल्गर यानेही खेळाडूंना संघाने व्यासपीठ दिले म्हणून तुम्ही आयपीएलपर्यंत पोहोचलात, असा दावा करून खेळाडूंची भावनिक कोंडी केली.
मंगळवारी दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने ( CSA) आगमी बांगलादेशविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांच्या मालिकेसाठी १६ सदस्यीय संघ जाहीर केला. १८ मार्चपासून ही मालिका सुरू होणार आहे आणि त्यासाठी निवडलेल्या संघात आयपीएलचे स्टार खेळाडूंचाही भरणा आहे.
क्विंटन डी कॉक, मार्को येनसेन, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, कागिसो रबाडा व रॅसी व्हॅन डेर ड्युसने यांचा या १६ सदस्यीय संघात समावेश करण्यात आला आहे. ही मालिका २३ मार्चला संपणार आहे आणि त्यानंतर दोन कसोटी सामने खेळवण्यात येतील.
जरी या खेळाडूंनी कसोटी मालिका खेळली नाही, तरी त्यांना आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांना मुकावे लागणार आहे. या खेळाडूंना तीन दिवस क्वारंटाईन रहावे लागेल. म्हणजे २७ मार्चला ते सरावाला सुरुवात करू शकतील. याचा अर्थ ड्वेन प्रेटोरियस याला पहिला सामना खेळता येणार नाही.
२७ मार्चला दिल्ली विरुद्ध मुंबई आणि पंजाब विरुद्ध बंगळुरू असा डबल हेडर सामना आहे. म्हणजेच कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी यांचे खेळणे अवघड आहे. एनरीच नॉर्खियाच्या दुखापतीबाबतही अद्याप काहीच अपडेट समोर आलेले नाहीत.
दक्षिण आफ्रिकेचा संघ - टेम्बा बवुमा ( कर्णधार), केशव महाराज ( उप कर्णधार), क्विंटन डी कॉक, झुबायर हम्झा, मार्को येनसेन, येनमन मलान, एडन मार्कराम, डेव्हिड मिलर, लुंगी एनगिडी, वेन पार्नेल, एंडील फेहलुकवायो, ड्वेन प्रेटोरियस, कागिसो रबाडा, तब्रेझ शम्सी, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले वेरेयने
आयपीएल २०२२मध्ये खेळणारे आफ्रिकेचे खेळाडू - कागिसो रबाडा ( पंजाब), फॅफ ड्यू प्लेसिस ( बंगळुरू), क्विंटन डी कॉक ( लखनौ), एनरिच नॉर्खिया ( दिल्ली), मार्को येनसेन ( हैदराबाद), डेव्हिड मिलर ( गुजरात), डेवॉल्ड ब्रेव्हिस ( मुंबई), एडन मार्कराम ( हैदराबाद), रॅसी व्हॅन डेर ड्युसेन ( राजस्थान), लुंगी एनगिडी ( दिल्ली), ड्वेन प्रेटोरियस ( चेन्नई)