Mumbai Indians : पाचवेळा इंडियन प्रीमिअर लीगच्या जेतेपदाचा ताज उंचावणाऱ्या मुंबई इंडियन्सची ( Mumbai Indians) IPL 2022मधील सुरुवात काही खास झालेली नाही. दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्याकडून त्यांना हार मानावी लागली.
कोलकाताविरुद्धच्या पराभवानंतर कर्णधार रोहित शर्माचा पारा चढलेला सर्वांना पाहिला. मुंबईच्या यशात खारीचा वाटा उचलणारे ट्रेंट बोल्ट, हार्दिक पांड्या, नॅथन कोल्टर नायल हे गोलंदाज यंदा वेगवेगळ्या संघाकडून खेळत आहेत. त्यामुळे आता फक्त जसप्रीत बुमराह हा एकमेव सक्षम पर्याय मुंबईकडे आहे.
रोहित शर्माच्या संघाला दिल्ली कॅपिटल्सविरूद्ध चार विकेट्सने, राजस्थान रॉयल्सविरुद्ध २३ धावांनी आणि कोलकाताविरुद्ध ५ विकेट्सने हार मानावी लागली. गुणतालिकेत त्यांना अद्याप खाते उघडता आलेले नाही आणि आज त्यांच्यासमोर पाचव्या क्रमांकावर असलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे आव्हान आहे.
रोहित शर्माला आतापर्यंत दमदार खेळी करता आलेली नाही. दिल्लीविरुद्ध त्याने ४१ धावा केल्या. राजस्थानविरुद्ध १० व कोलकाताविरुद्ध ३ धावांवर तो माघारी परतला.
मुंबई इंडियन्सला अद्याप हार्दिक पांड्याचा सक्षम पर्याय मिळालेला नाही. डॅनिएल सॅम्स संघात आहे, परंतु त्याला अपयश आले. दिल्लीविरुद्ध त्याने ७ धावा केल्या आणि गोलंदाजीत ५७ धावा दिल्या. राजस्थानविरुद्ध तो शून्यावर बाद झाला.
जोफ्रा आर्चर हा पुढील पर्वात खेळणार आहे आणि त्यामुळे यंदा जसप्रीत बुमराहला साजेशी साथ देणारा गोलंदाज मुंबईकडे नाही.