आयपीएल ही क्रिकेट विश्वातील सर्वाधिक लोकप्रिय लीग म्हणून ओळखली जाते. त्यामुळे लीगवर पैसा देखील तितकाच खर्च होतो आणि लिलावात खेळाडूंवरही फ्रँचायझी कोट्यवधींचा खर्च करताना पाहायला मिळतात. यावेळीच्या लिलावात ईशान किशन, दीपक चहर, श्रेयस अय्यर यांच्यासारख्या युवा खेळाडूंवर कोट्यवधींची बोली लागली. तर सुरेश रैना, स्टीव्ह स्मिथ, डेविड मलानसारखे अनुभवी खेळाडूंना खरेदीदार मिळाला नाही.
आयपीएलच्या यंदाच्या सीझनचा रोमांच २ एप्रिलपासून सुरू होणार असून ३ जूनपर्यंत स्पर्धा चालणार आहे. यावेळी स्पर्धेत १० संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. यावेळी खेळाडूंचा मेगा लिलाव घेण्यात आला आणि खेळाडूंवर झालेल्या कोट्यवधींच्या रुपयांची उधळण संपूर्ण जगानं पाहिली. पण खेळाडूंच्या मानधनाची नेमकी प्रक्रिया कशी असते याबाबत कल्पना अनेकांना नाही. याचीच माहिती आपण आज करुन घेणार आहोत.
खेळाडूवर जितकी बोली लागलेली असते तेच त्याचं मानधन असतं. त्या हिशोबानुसार त्यावरील कर आकारला जातो. त्यांना मिळालेल्या बोलीत इतर कुणीही भागीदार नसतं. ती संपूर्णपणे त्या खेळाडूला मिळालेली बोली असते. तसंच हे मानधन संबंधित खेळाडूला प्रत्येक सीझननुसार दिलं जातं.
उदाहरणार्थ- एखाद्या खेळाडूवर १० कोटींची बोली लागली आणि त्याला खरेदी केलं गेलं असेल तर ती रक्कम एका सीझनसाठीची असते. त्या खेळाडूसोबत तीन वर्षांचा करार फ्रँचायझीनं केला असेल तर १० कोटींची रक्कम त्याला दरवर्षी मिळते. म्हणजेच प्रतिसीझननुसार संबंधित खेळाडूला ३० कोटी रुपये मिळतील.
एखाद्या खेळाडूला संपूर्ण सीझनसाठीचं मानधन देण्यात आलेलं असेल तर तो खेळाडू किती सामने खेळतो याचा काहीच फरक पडत नाही. त्यानं किती सामने खेळले किंवा त्याची निवड झाली याचा काहीच फरक करार झालेल्या खेळाडूंच्या मानधनावर पडत नाही.
उदाहरणार्थ- समजा एका खेळाडूला तीन वर्षांच्या करारावर खरेदी केलं गेलं असेल आणि पुढील सीझनसाठी त्याला रिटेन करण्यात आलं असेल तर त्याच्या करारात वाढ करण्यात येते. या परिस्थितीत संबंधित खेळाडूला याआधी देण्यात आलेल्या मानधनावरच वाढ मिळते. अर्थात एखाद्या संघाला जर आपल्या खेळाडूचं मानधन वाढवून त्याला रिटेन करण्याची इच्छा असेल तर तसं करता येतं. सर्वसमान्यत: सर्व खेळाडूंना मानधन वाढवूनच रिटेन केलं जातं.
एखाद्या खेळाडूला दुखापतीमुळे सीझन सुरू होण्याआधीच जर स्पर्धेबाहेर जावं लागलं. तर फ्रँचायझीला संबंधित खेळाडूला मानधन देण्याची गरज भासत नाही. पण एखाद्या खेळाडूला संपूर्ण सीझन ऐवजी काही सामने खेळल्यानंतर दुखापत झाली असेल तर संबंधित खेळाडूला प्रो रेटा आधारावर मानधन द्यावंच लागतं. तसंच खेळाडूंच्या दुखापतीचा खर्च देखील फ्रँयाचझीला करावा लागतो.
एखाद्या खेळाडूला करार संपुष्टात होण्याआधीच स्पर्धेबाहेर व्हायचं असेल तर तो फ्रँचायझीकडे तशी मागणी करू शकतो. करार संपुष्टात येण्याआधीच जर खेळाडू संघ सोडण्याचा निर्णय घेत असेल तरीही फ्रँचायझीला संबंधित खेळाडूला संपूर्ण मानधन द्यावं लागतं.
खास बाब अशी की सर्व फ्रँचायझींना खेळाडूंना एकरकमी पेमेंट द्यावं लागत नाही. खेळाडूंना मानधन कसं दिलं जावं हे फ्रँचायझीकडे नेमकी किती रक्कम शिल्लक आहे आणि स्पॉन्सरशीपचा पैसा कोणत्या पद्धतीनं येत आहे या गोष्टींवर अवलंबून असतं. तर काही फ्रँचायझी खेळाडूंना एक रकमी पेमेंट करतात.