IPL 2022 Mega Auction U19 WC Stars Not ELIGIBLE - यश धुलच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील संघाने नुकताच अंडर १९ वर्ल्ड कप जिंकला आणि या संघाचे मायदेशात आज जंगी स्वागत झाले. भारताने १९ वर्षांखालील वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात इंग्लंडवर ४ विकेट्स राखून विजय मिळवला. राज बावा या सामन्यातील नायक ठरला, तर शेख राशीद, यश धुल, रवी कुमार यांनीही ही स्पर्धा गाजवली.
वर्ल्ड कप गाजवल्यानंतर भारताचे हे युवा शिलेदार आयपीएल २०२२ खेळण्यासाठी उत्सुक आहेत. पण, हाती आलेल्या बातमीनुसार वर्ल्ड कप विजेत्या संघातील ८ खेळाडू हे आयपीएल २०२२ मेगा ऑक्शनसाठी पात्र ठरत नाहीत आणि या खेळाडूंमध्ये शेख राशीद, दिनेश बाना, रवी कुमार या स्टार खेळाडूंचा समावेश आहे.
या खेळाडूंनी बीसीसीआयकडे त्यांचा समावेश मेगा ऑक्शनमध्ये करून घेण्यासाठी विनंती केली आहे. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार BCCIच्या पात्रता निकषानुसार वर्ल्ड कप विजेत्या संघातील ८ खेळाडू ऑक्शनसाठी पात्र ठरत नाहीत.
हरयाणाचा दिनेश बाना, आंध्रप्रदेशचा शेख राशीद यांच्यासह अंगक्रिष रघुवंशी, मानव पारख, निशांत सिंधू, ग्राव सांगवान, रवी कुमार व सिद्धार्थ यादव हे खेळाडू बीसीसीआयच्या नियमानुसार आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरत नाहीत.
बीसीसीआयच्या नियमानुसार अनकॅप ( राष्ट्रीय संघाचे प्रतिनिधित्व न केलेला खेळाडू) खेळाडूला ऑक्शनसाठी पात्र होण्यासाठी दोन नियमांची पुर्तता करणे गरजेचे आहे.
पहिला- खेळाडूचे वय १९ वर्षांपेक्षा अधिक असायला हवे , दुसरा - जर त्याचं वय १९ वर्षांखालील असेल तर किमान त्याने राज्याच्या संघाकडून किमान एक लिस्ट ए सामना ( वरिष्ठ स्तरावर) खेळायला हवा. भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघातील ८ खेळाडू या निकषाची पूर्तता करत नाहीत.
''बीसीसीआयनं काही विषेश प्रसंगी या नियमाचा पुनर्विचार करायला हवा आणि खेळाडूंना या नियमांमुळे संधी नाकारली जाऊ नये. भारताच्या १९ वर्षांखालील संघाने दमदार कामगिरी केली आहे आणि त्यांना ही मोठी संधी मिळण्यापासून रोखता कामा नये,''असे मत बीसीसीआयच्या रत्नाकर शेट्टी यांनी इंडियन एक्स्प्रेशशी बोलताना व्यक्त केले.
अर्जुन तेंडुलकरनं मुंबईच्या सीनिअर संघात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी ट्वेंटी-20 लीगमधून पदार्पण केलं होतं. त्यात त्यानं दोन सामन्यांत दोन विकेट्स घेतल्या. मुंबईच्या सीनियर संघाकडून पदार्पण करताच अर्जुन आयपीएल ऑक्शनसाठी पात्र ठरला होता. तो आता पुन्हा लिलिवात उतरला आहे आणि यावेळी त्याला मुंबई इंडियन्स पुन्हा घेतील का, याची उत्सुकता लागली आहे. यावेळेसही त्याची मुळ किंमत ही २० लाख असणार आहे.