मुंबई इंडियन्सनं इंडियन प्रीमिअर लीगची ( IPL 2020) ट्रेड विंडो बंद होण्यापूर्वी आपल्या 10 खेळाडूंना रिलीज केलं आणि ट्रेंट बोल्टसारख्या मुख्य गोलंदाजाला आपल्या ताफ्यात दाखल करून घेतलं. रिलीज केलेल्या खेळाडूंनंतर कसे असतील मुंबई इंडियन्सचे अंतिम अकरा खेळाडू...
क्विंटन डी कॉक - मुंबई इंडियन्सकडून गतवर्षी आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या डी कॉकनं 529 धावा चोपल्या. त्यात चार अर्धशतकांचा समावेश आहे.
रोहित शर्मा - आयपीएलमधील यशस्वी कर्णधार रोहितनं मागील मोसमात 15 सामन्यांत 405 धावा केल्या. रोहितनं दोन अर्धशतकं केली आहेत.
सूर्यकुमार यादव - सय्यद मुश्ताक अली चषक स्पर्धेत सूर्यकुमारची बॅट चांगलीच तळपत आहे. त्यामुळेच त्याची भारतीय संघात निवड करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. त्यानं मधल्या फळीत खेळताना मागील मोसमात 16 सामन्यांत 424 धावा केल्या.
इशान किशन - चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला येणाऱ्या इशानला मागील मोसमात 7 सामन्यांत 101 धावा करता आल्या. पण, तो कोणत्याही क्षणी फॉर्मात येऊ शकतो आणि मुंबईसाठी ती जमेची बाब आहे.
किरॉन पोलार्ड - वेस्ट इंडिजच्या या अष्टपैलू खेळाडूनं ट्वेंटी-20 क्रिकेटमधील आपली बादशाहत सिद्ध केलेली आहे.
हार्दिक पांड्या - हार्दिक दुखापतीमुळे बराच काळ क्रिकेटपासून दूर आहे, परंतु मैदानावर परतून फटकेबाजी करण्याची भूक तो आयपीएलच्या पुढील मोसमात पूर्ण करेल.
कृणाल पांड्या - हार्दिकचा बंधू कृणाल फलंदाजीसोबत गोलंदाजीतही योगदान देतो. या दोघांनी मिळून 585 धावा आणि 26 विकेट्स घेतल्या आहेत.
राहुल चहर - कृणालला फिरकीत राहुलकडून मदत मिळेल. मयांक मार्कंडेला रिलीज केल्यानंतर राहुल त्याची उणीव भरून काढू शकतो. राहुलनं मागील मोसमात 13 विकेट्स घेतल्या आहेत.
ट्रेंट बोल्ट - दिल्ली कॅपिटल्सच्या या गोलंदाजाला आपल्या ताफ्यात घेत मुंबईनं आपल्या जलदगती गोलंदाजाची फळी मजबूत केली आहे.
जसप्रीत बुमराह - मुंबई इंडियन्सचा हा हुकूमी एक्का आहे.
लसिथ मलिंगा- ट्वेंटी-20 क्रिकेटचा हुकूमी एक्का मलिंगा हा मुंबईचा प्रमुख खेळाडू आहे.