भारतीय संघातील अजून एका अष्टपैलू खेळाडूच्या हातात लग्नाची बेडी पडली आहे. राजस्थान रॉयल्सचा अष्टपैलू खेळाडू राहुल तेवटिया विवाहबंधनात अडकला आहे. त्याने आपल्या विवाहाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
राहुल तेवटिया आणि रिद्धी पन्नू यांच्या विवाह सोहळ्यामध्ये अनेक क्रिकेटपटू सहभागी झाले होते. रिषभ पंत, नितीश राणा, युझवेंद्र चहल राहुल तेवटियाला शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते.
२०२० साली झालेल्या आयपीएलमध्ये एकाच षटकात पाच षटकार ठोकून संघाला विजय मिळवून दिल्यानंतर राहुल तेवटिया प्रसिद्धीच्या झोताता आळा होता. त्यानंतर तो राजस्थान रॉयल्सच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक बनला होता.
राहुल तेवटियाच्या पत्नीचे नाव रिद्धी पन्नू आहे. यावर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांचा साखरपुडा झाला होता.
मुळचा हरियामामधील असलेल्या राहुल तेवटियाने २०१३-१४ च्या रणजी करंडक स्पर्धेतून प्रथमश्रेणी क्रिकेटमधील कारकिर्दीला सुरुवात केली होती. नुकत्याच झालेल्या मुश्ताक अली स्पर्धेत राहुल तेवटियाने आंध्र प्रदेशविरुद्ध २५ चेंडूत ४६ धावांची खेळी केली होती. या खेळीच्या जोरावर हरियाणाने हा सामना ६ विकेट्सनी जिंकला होता.
आयपीएलमधील यशस्वी कामगिरीनंतर यावर्षाच्या सुरुवातीला इंग्लंडविरुद्ध झालेल्या टी-२० मालिकेसाठी राहुल तेवटियाची भारतीय संघात निवड झाली होती. मात्र त्याला पदार्पणाची संधी मिळाली नव्हती.
राहुल तेवटिया आयपीएलच्या १५ व्या हंगामात कुठल्या संघाकडून खेळणार याबाबत सध्यातरी सस्पेंस आहे. कारण आयपीएल २०२२ पूर्वी खेळाडूंसाठी मेगा ऑक्शन होणार आहे. त्यामुळे अनेक खेळाडू जुन्या संघांकडून खेळताना दिसणार नाहीत.