यावर्षीच्या विस्डेन अल्मानॅक २०२६ वर भारतीय क्रिकेटपटूंचा दबदबा दिसून आला आहे. यावर्षीच्या विस्डेनच्या एकूण ९ पुरस्कारांपैकी ७ पुरस्कारांवर आपले नाव कोरले. या यादीमध्ये दीप्ती शर्मा आणि अभिषेक शर्मा चमकले असून, दीप्तीला वुमेन्स क्रिकेटर ऑफ द इयर, तर अभिषेक शर्मा याला टी-२० क्रिकेटर ऑफ द इयर पुरस्कार जाहीर झाला आहे.
याबरोबरच शुभमन गिल, मोहम्मद सिराज, रिषभ पंत, आणि रवींद्र जडेजा यांचा विस्डेनच्या पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यात आला. या खेळाडूंनी गतवर्षी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या कसोटी मालिकेत जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं.
या यादीमध्ये केवळ दोन बिगर भारतीय खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.त्यामध्ये ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क याची मेन्स क्रिकेटर ऑफ द वर्ल्ड म्हणून निवड करण्यात आहे. तर इंग्लंडचा फलंदाज हसीब हमिद याचा वर्षातील पाच सर्वोत्तम क्रिकेटपटूंमध्ये समावेश करण्यात आला.
गतवर्षी झालेल्या महिलांच्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेमध्ये २२ बळी टिपणाऱ्या दीप्ती शर्मा हिला वर्षातील सर्वोत्तम महिला क्रिकेटपटूचा सन्मान जाहीर झाला आहे. दीप्तीने केलेल्या अष्टपैलू खेळाच्या जोरावर भारताने मुंबईत झालेल्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेला पराभूत करून पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं होतं.
अभिषेक शर्मासाठी २०२५ चा हंगााम कारकिर्दीच्या दृष्टीने टर्निंग पॉईंट ठरला होता. त्याने २१ सामन्यांमध्ये तब्बल १९३ च्या स्ट्राईक रेटने ८५९ धावा जमवल्या होत्या. यामध्ये एक एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
भारताचा कसोटी कर्णधार शुभमन दिल याने इंग्लंडच्या दौऱ्यामध्ये जबरदस्त खेळाचं प्रदर्शन केलं होतं. त्याने या मालिकेत ७५४ धावा कुटून भारताला पाच कसोटी सामन्यांची मालिका २-२ अशा बरोबरीत सोडवण्यात यश मिळवलं होतं.
वर्षातील पाच सर्वोत्तम खेळाडूंमध्ये समावेश असलेल्या मोहम्मद सिराजने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत २३ बळी टिपले होते. तर रिषभ पंत याने दुखापतग्रस्त होण्यापूर्वी मालिकेत ४७९ धावा कुटून काढल्या होत्या.