क्रिकेट कारकीर्द अन् भीषण अपघात! आयुष्याचा संघर्ष सांगताना पंतला अश्रू अनावर

rishabh pant emotional: रिषभ पंत मागील दीड वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहे.

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत मागील दीड वर्षापासून क्रिकेटपासून दूर आहे. डिसेंबर २०२२ मध्ये झालेल्या कार अपघातानंतर पंत अद्याप क्रिकेटमध्ये परतला नाही. आता तो थेट आयपीएल २०२४ मध्ये दिसण्याची शक्यता आहे.

क्रिकेटपासून दूर असलेला पंत प्रसिद्धीपासून दूर राहिला नाही. तो अनेकदा त्याच्या सहकारी खेळाडूंसोबत विविध कार्यक्रमांमध्ये दिसतो. अलीकडेच त्याच्या बहिणीच्या साखरपुड्यात रिषभ भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीसोबत दिसला होता.

पंतने 'स्टार स्पोर्ट्स'ला दिलेल्या मुलाखतीत विविध बाबींवर भाष्य केले आहे. संघातील वरिष्ठ खेळाडू आणि युवा खेळाडू यांचे ड्रेसिंग रूममधील किस्से त्याने सांगितले आहेत.

त्याने सांगितले की, सुरूवातीला भारतीय संघात आलो तेव्हा अनेक अनेक वरिष्ठ खेळाडू होते. युवराज सिंग, महेंद्रसिंग हे संघाचे भाग होते. थोडा सिनियर्ससारखा हिशोब असायचाच पण वेळ लागतो. मला वरिष्ठांनी कधीच मी ज्युनिअर असल्याचा भास होऊ दिला नाही.

"वरिष्ठ खेळाडू चांगले स्वागत करणारे होते. कोणताही नवा खेळाडू किंवा युवा शिलेदार आला की त्याला सोयीस्कर बनवले जाते. मला वाटते की एकमेकांना समजून घेणे ही संघाची संस्कृती आहे"

रिषभने भारतीय कर्णधाराचे कौतुक करताना म्हटले, "रोहित भाई नेहमी कोणता ना कोणता विनोद करत असतो. तो मला सांगतो की, तुला 'रिश-बॉल' बनण्याची गरज आहे. तुला खेळण्याची कला माहित आहे. इतरांनी ही खेळण्याची शैली शिकायला हवी."

भारतीय संघातील प्रवेश अन् भीषण अपघात इथपर्यंतचा प्रवास मांडताना रिषभ पंत भावूक झाला. सध्या पंत विश्रांती घेत असून लवकरच मैदानात परतेल अशी आशा आहे.

अपघाताबद्दल पंतने सांगितले की, मी नेहमी या वेळेत घरी जायचो. आईला सरप्राईज द्यावे अशी माझी योजना असते. तेव्हा मी गाडी चालवत होतो ते एक बरं झालं. अन्यथा दुसरा कोणी चालवत असता तर मी काय विचार केला असता मला माहित नाही. मी गाडी चालवत असल्यामुळे मी मान्य केले की माझ्याकडून चूक झाली आहे.

दरम्यान, रिषभ पंतने भारताकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये क्रिकेट खेळले आहे. त्याने आतापर्यंत ३३ कसोटी, ३० वन डे आणि ६६ ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत.