वेस्ट इंडिजविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेला सुरुवात होताच भारतीय संघाच्या नावे एका खास विक्रमाची नोंद होणार आहे. या मालिकेतील पहिल्या वनडेत खेळण्यासाठी उतरताच भारतीय संघ एकदिवसीय क्रिकेटमध्ये असे काही करेल जे याआधी कुठल्याही संघाला करता आलेले नाही. हा विक्रम जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम असलेल्या अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर नोंदवला जाईल.
भारत आणि वेस्ट इंडिजमध्ये ६ फेब्रुवारीपासून ३ एकदिवसीय सामन्यांची मालिकी खेळवली जाणार आहे. या मालिकेत अनेक मोठे वैयक्तिक आणि सांघिक विक्रम नोंदवले जातील. मात्र यामधील सर्वात मोठा विक्रम हा भारतीय संघाच्या नावे नोंदवला जाईल. हा विक्रम जगातील दुसऱ्या कुठल्याही संघाला नोंदवता आलेला नाही.
भारतीय संघ ६ फेब्रुवारी रोजी जेव्हा वेस्ट इंडिजविरुद्ध अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी उतरेल. हा भारतीय क्रिकेट संघाचा एक हजारावा एकदिवसीय सामना असेल. एक हजार एकदिवसीय सामने खेळणारा भारतीय संघ जागतिक क्रिकेटमधील पहिला संघ ठरेल.
भारतीय संघाने १३ जुलै १९७४ रोदी इंग्लंडविरुद्ध लीड्समध्ये आपला पहिला एकदिवसीय सामना खेळला होता. त्या सामन्यात भारतीय संघाला चार विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला होता. तेव्हापासून आतापर्यंत भारताने ९९९ एकदिवसीय सामने खेळले आहे. त्यातील ५१८ सामन्यात भारताचा विजय झाला आहे. तर ४३१ सामन्यात भारतीय संघाचा पराभव झाला आहे.
एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक विजयांच्या बाबतीत भारतीय संघ (५१८ विजय) ऑस्ट्रेलियानंतर (५८१ विजय) सर्वाधिक विजय मिळवणारा दुसरा संघ आहे. तर सर्वाधिक पराभवांच्या बाबतीत भारतीय संघ (४३१ पराभव) श्रीलंकेपाठोपाठ (४३२) पराभव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
भारतीय संघ वगळता केवळ दोनच संघांना ९०० हून अधिक एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यामध्ये ऑस्ट्रेलियाने आतापर्यंत ९५८ एकदिवसीय सामने खेळले आहेत. त्यात ५८१ विजय आणि ३३४ पराभव पत्करले आहेत. तर पाकिस्तानने ९३६ सामने खेळले असून, त्यात पाकिस्तानला ४९० विजय आणि ४१७ पराभव पत्करावे लागले आहेत.