India vs Sri Lanka Match: हार्दिक पांड्यानं अक्षर पटेलला का दिली अखेरची ओव्हर? स्वत: सांगितलं मोठं कारण

भारताने या सामन्यातील विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली.

श्रीलंकेने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि गोलंदाजांनी चांगली कामगिरीही करून दाखवली. पदार्पणवीर शुभमन गिल ( ७), सूर्यकुमार यादव ( ७) व संजू सॅमसन ( ५) हे माघारी परतले. इशान किशनने कर्णधार हार्दिक पांड्यासह त्याने ३१ धावांची भागीदारी केली. पण, तो ३७ धावांवर ( ३ चौकार व २ षटकार) माघारी जावे लागले. हार्दिक २९ धावांवर यष्टीरक्षकाच्या हाती तो झेल देऊन माघारी परतला.

१६व्या षटकात दीपक हुडाने गिअर बदलला अन् थिक्सानाला सलग दोन षटकार खेचून चाहत्यांमध्ये ऊर्जा फुंकली. दीपक हुडा व अक्षर पटेल यांनी अखेरच्या पाच षटकांत फटकेबाजी केली. अक्षरने २० चेंडूंत ३ चौकार व १ षटकारासह नाबाद ३१ धावा केल्या, तर दीपकने २३ चेंडूंत १ चौकार व ४ षटकारासह नाबाद ४१ धावा केल्या. या दोघांनी ३५ चेंडूंत ६८ धावांची भागीदारी केली आणि भारताने ५ बाद १६२ धावांपर्यंत मजल मारली.

उम्रानने २७ धावा देत २ विकेट्स घेतल्या. शिवमने पदार्पणाच्या सामन्यात २२ धावांत ४ विकेट्स घेत प्रभाव पाडला. प्रग्यान ओझा ( ४/२१) आणि बरींदर सरन ( ४/१०) यांनी अनुक्रमे २००९ व २०१६ मध्ये पदार्पणात ट्वेंटी-२०त चार विकेट्स घेतल्या होत्या. सामन्यात श्रीलंकेच्या चमिका करुणारत्नेने अखेरपर्यंत संघर्ष केला. हर्षल पटेलने टाकलेल्या १९व्या षटकात १३ धावा आल्या अन् श्रीलंकेला ६ चेंडूंत विजयासाठी १३ धावा करायच्या होत्या.

अक्षर पटेलला अखेरचे षटक दिले अन् पहिल्या दोन चेंडूवर दोन धावा आल्यानंतर तिसरा चेंडू सीमापार पाठवला. करुणारत्नेला ३ चेंडूंत ५ धावा करायच्या होत्या. १ चेंडूंत ४ धावा असा सामना आला अन् करुणारत्नेच स्ट्राईकवर होता. पण, तो अपयशी ठरला अन् भारताने २ धावांनी सामना जिंकला. श्रीलंकेचा संघ १६० धावांत तंबूत परतला. करुणारत्ने १६ चेंडूंत २३ धावांवर नाबाद राहिला.

बॅटनं कमाल करणाऱ्या अक्षर पटेलनं गोलंदाजीतही कमाल केली. त्याला कोणतीही विकेट मिळाली नाही. परंतु अखेरच्या षटकात १३ धावा वाचवून भारतीय संघाला विजय मिळवून दिला. अखेरच्या षटकात १३ धावांची गरज असताना हार्दिक पांड्यानं त्याच्यावर विश्वास दाखवला. अखेरचं षटक त्यालाच का दिलं, याबाबत त्यानं वक्तव्यही केलं आहे.

एका रणनितीनुसारच फिरकीपटू अक्षरला त्यानं अखेरचं षटक दिलं. मी आपल्या संघाला आव्हानात्मक परिस्थिती जाणूनबुजून घालू इच्छित होतो. कारण आम्हाला मोठ्या सामन्यात आणि कठीण परिस्थितीत खूप मदत मिळेल. आम्ही आम्हालाच यापुढए असं आव्हान देणार आहोत, असं हार्दिक म्हणाला.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर सर्वांनी कठीण परिस्थितीत चांगली कामगिरी केली. आमच्यात सामान्य चर्चा झाली. मी त्याला (शिवम मावी) आयपीएलमध्ये गोलंदाजी करताना पाहिलंय. त्याची ताकद माहित आहे. मी त्याला आरामात गोलंदाजी करताना सांगितलं. मोठ्या हिटची चिंता करू नका. मी आपल्या स्विंग गोलंदाजीवर खूप काम करत आहे. मला इनस्विंगमध्ये मदत मिळत आहे. मी नेट प्रॅक्टिस करत आहे. नव्या चेंडून मला गोलंदाजी करायला आवडतं, असंही त्यानं सांगितलं.

दीपक हुडा व अक्षर पटेल यांच्या दमदार फटकेबाजीच्या जोरावर भारताने आव्हानात्मक धावसंख्या उभी केली. पदार्पणवीर शिवम मावीने प्रभावी गोलंदाजी केली आणि त्याला हर्षल पटेल व उम्रान मलिक यांची साथ मिळाली. श्रीलंकेच्या दासून शनाकाने अखेरच्या षटकांत चांगला खेळ करताना भारतावर दडपण निर्माण केले होते, परंतु त्याची विकेट पडली अन् भारताचा विजयाचा मार्ग मोकळा झाला. भारताने या विजयासह मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. शिवम मावीनं चार विकेट्स घेतल्या.