भुवनेश्वर कुमार, दीपक चहर व हार्दिक पांड्या हे जलदगती गोलंदाज अपयशी ठरल्यानंतर कर्णधार शिखर धवननं ( Shikhar Dhawan) फिरकी गोलंदाजांना पाचारण केले. चहलनं पहिल्याच षटकाच्या पहिल्याच चेंडूवर श्रीलंकेला धक्का दिला, त्यानंतर कुलदीपनं एकाच षटकात दोन विकेट्स घेतल्या.
श्रीलंकेनं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. अविष्का फर्नांडो व मिनोद भानुका यांनी चांगली सुरूवात करून दिली. दोघांची ४९ धावांची भागीदारी चहलनं संपुष्टात आणली. त्यानंतर कुलदीपनं भानुका व भानुका राजपक्षा यांना एकाच षटकात माघारी पाठवले. कृणाल पांड्यानं चौथा धक्का दिला.
२५ षटकांत श्रीलंकेच्या ४ बाद ११७ धावा झाल्या आहेत.टीम इंडियानं आजच्या सामन्यासाठी सूर्यकुमार यादव व इशान किशन यांना वन डे संघात पदार्पणाची संधी दिली आहे. इंग्लंडविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत इशान व सुर्या यांनी एकत्रच ट्वेंटी-२० संघात पदार्पण केलं होतं अन् आज वन डे संघातही ही दोघं सोबतच पदार्पण करत आहेत.
कर्णधार धवननं अफलातून झेल टिपत कुलदीपला विकेट मिळवून दिली. या सामन्यातून प्रथमच कर्णधारपद भूषविणारा धवन हा भारताचा सर्वात वयस्कर कर्णधार ठरला आहे. २०१५नंतर टीम इंडिया प्रथमच विराट कोहली, रोहित शर्मा आणि महेंद्रसिंग धोनी यांच्याशिवाय मैदानावर उतरली आहे.
शिखर धवनचा हा १४२वा वन डे सामना आहे आणि त्याला प्रथमच टीम इंडियाचे नेतृत्व करण्याची संधी मिळाली आहे. अनिल कुंबळेला २१७ आणि रोहित शर्माला १७१ सामन्यानंतर अशी संधी मिळाली होती. राहुल द्रविडला १३८ सामन्यानंतर नेतृत्व करण्याचा मान मिळाला होता.
भारताच्या वन डे संघाचे नेतृत्व करणारा धवन हा वयस्कर कर्णधार ठरला. धवन हा ३५ वर्ष व २२५ दिवसांचा आहे. यापूर्वी मोहिंदर अमरनाथ यांनी ३४ वर्ष व ३७ दिवसांचे असताना टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळले होते.
या सामन्यात राहुल द्रविडही मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत प्रथमच दिसत आहे आणि त्याच्या शिस्तीचा इम्पॅक्ट टीमवर जाणवला. काही महिन्यांपूर्वी संघातील सहकाऱ्यावर खवळणारा कृणाल पांड्या आज चक्र प्रतिस्पर्धी संघातील फलंदाजाला मिठी मारताना दिसला.