India vs South Africa: वन डे संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्याच्या BCCIच्या निर्णयावर विराट कोहली ( Virat Kohli) अजूनही नाराज आहे. भारतीय संघ १६ डिसेंबरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर रवाना होणार आहे.
रविवारी सर्व खेळाडूंना मुंबईत कॅम्पमध्ये दाखल होण्यास सांगितले होते, परंतु विराट अजूनही दाखल झालेला नाही. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी निवडलेल्या खेळाडूंनी सराव सत्रातही सहभाग घेतला, परंतु कोहलीनं हे सत्रही चुकवलं. सोमवारी सर्व खेळाडू तीन दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीत दाखल होतील.
''विराटला कळवण्यात आले होते, परंतु तो अद्याप कॅम्पमध्ये दाखल झालेला नाही. सोमवारी तो दाखल होईल, अशी अपेक्षा आहे. जोहान्सबर्गला रवाना होण्यापूर्वी खेळाडूंना तीन दिवस बायो-बबलमध्ये रहावे लागेल,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport ला सांगितले.
काही बीसीसीआयचे अधिकारी विराटला कॉल करत आहेत, परंतु त्याच्याकडून ना रिटर्न कॉल आलाय किंवा नाही तो कॉलही उचलत नसल्याचे वृत्त समोर येत आहे. याआधी विराटचा फोटन स्वीच ऑफ असल्याचे त्याचे प्रशिक्षक राजकुमार शर्मा यांनी सांगितले होते.
कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ १६ डिसेंबरला मुंबईहून चार्टर्ड विमानानं जोहान्सबर्गसाठी रवाना होणार आहे. दक्षिण आफ्रिकेत ओमायक्रॉनचं संकट असल्यानं खेळाडूंना कडकडीत बायो-बबलमध्ये रहावे लागणार आहे. त्यामुळे भारतीय खेळाडू मुंबईत तीन दिवस क्वारंटाईनमध्ये राहणार आहेत.
विराटनं सराव सत्रात सहभाग घेतला नसला तरी तो आज क्वारंटाईन कालावधी पूर्ण करण्यासाठी कॅम्पमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. २६ डिसेंबरला भारतीय संघ पहिली कसोटी खेळणार आहे.
विराट कोहलीनं अद्याप रोहितला वन डे संघाचा कर्णधार झाला, म्हणून शुभेच्छा दिलेल्या नाहीत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे बीसीसीआयनं घोषणा केल्यानंतर विराटनं सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्या, पण त्यात रोहितला शुभेच्छा देणारी एकही पोस्ट नव्हती.
भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा ( उपकर्णधार), लोकेश राहुल, मयांक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, श्रेयस अय्यर, हनुमा विहारी, रिषभ पंत, वृद्धीमान सहा, आर अश्वीन, जयंत यादव, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, उमेश यादव, जसप्रीत बुमराह, शार्दूल ठाकूर, मोहम्मद सिराज; राखीव - नवदीप सैनी, सौरभ कुमार, दीपक चहर, अर्झान नगवास्वाला
पहिली कसोटी - २६ ते ३० डिसेंबर, दुपारी १.३० वाजल्यापासून, सेंच्युरियन; दुसरी कसोटी - ३ ते ७ जानेवारी, २०२२, दुपारी १.३० वाजल्यापासून, जोहान्सबर्ग; तिसरी कसोटी - ११ ते १५ जानेवारी, २०२२, दुपारी २ वाजल्यापासून, केप टाऊन