भारतीय क्रिकेट संघाचा दक्षिण आफ्रिका दौरा आता सुरू होत आहे. या दौऱ्यात भारतीय संघ ३ कसोटी आणि ३ एकदिवसीय सामने खेळणार आहे. २६ डिसेंबरला सुरू होणारी ही मालिका भारतीय संघासाठी खूप आव्हानात्मक ठरणार आहे. मात्र यापेक्षा मोठे आव्हान भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेमध्ये कोरोनाच्या ओमायक्रॉन व्हेरिएंटपासून वाचवण्याचे आहे.
दक्षिण आफ्रिका क्रिकेट बोर्डाने टीम इंडियाला सुरक्षित ठेवण्यासाठी आकाश पाताळ एक केले आहेत. मिळात असलेल्या रिपोर्टनुसार टीम इंडिया प्रिटोरियाच्या एका रिसॉर्टमध्ये थांबणार आहे. हा रिसॉर्ट आतापासूनच पूर्णपणे सिल करण्यात आला आहे.
भारतीय क्रिकेट टीम आलिशान आयरिन कंट्री लॉजमध्ये थांबणार आहे. या लॉजमध्ये भारतीय संघ पोहोचण्यापूर्वीच तिथे बायो बबल लॉकडाऊन करण्यात आले आहे. तसेच दक्षिण आफ्रिकेतील मीडिया रिपोर्टनुसार भारतीय संघ १७ डिसेंबर रोजी हॉटेलमध्ये पोहोचणार आहे. याच रिसॉर्टमध्ये आधी श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेचे संघ थांबले होते.
क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने हॉटेलच्या व्यवस्थापनाला स्पष्ट आदेश दिलेले आहे. ज्या हॉटेलमध्ये भारतीय संघ थांबला आहे, तिथे कुठलीही बाहेरची व्यक्ती प्रवेश करू शकत नाही. तसेच येथील स्टाफलाही क्वारेंटाईन राहावे लागेल. तसेच हॉटेल स्टाफचीही कोरोना चाचणी होणार आहे. त्याशिवाय हॉटेलमध्ये कोविड-१९ शी संबंधित डॉक्टर आणि अधिकारी तैनात असतील.
दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या ओमायक्रॉन व्हेरिएंटमुळे भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा अडचणीत सापडला होता. मात्र बीसीसीआयने कसोटी आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाला दक्षिण आफ्रिकेमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या दौऱ्यातील टी-२० मालिका स्थगित करण्यात आली आहे.