५ जानेवारी २०१८ रोजी केप टाऊनच्या न्यूलँड्स मैदानावर भारताचा वेगवान गोलंदाा जसप्रीत बुमराहने पदार्पण केलं होतं. आता चार वर्षांनंतर त्याच मैदानावर बुमराहने केप टाऊन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पाच विकेट्स टिपण्याचा पराक्रम केला आहे. त्याने ४२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. त्या कामगिरीच्या जोरावर बुमराहने अनेक विक्रम आपल्या नावे केले आहेत.
केप टाऊन कसोटी हा बुमराहचा परदेशातील २५ वा कसोटी सामना आहे. तसेच तो २५ सामन्यात सर्वाधिक बळी टिपणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. याआधी पहिल्या २५ कसोटींमध्ये परदेशात भागवत चंद्रशेखर यांनी १०० विकेट्स टिपल्या होत्या. मात्र बुमराहने एवढ्याच सामन्यात १०८ बळी टिपले आहेत.
जसप्रीत बुमराहने कसोटीत पदार्पण केल्यापासून तो कसोटीत सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. बुमराहने ७ वेळा डावात पाच बळी टिपले आहेत. जागतिक क्रिकेटमध्ये जेसन होल्डर आणि टीम साऊदी हे बुमराहच्या बरोबरीत आहेत.
दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर जसप्रीत बुमराहने दुसऱ्यांदा डावात पाच बळी टिपण्याचा विक्रम केला आहे. त्याने मोहम्मद शमी, व्यंकटेश प्रसाद आणि एस. श्रीशांतची बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये सर्वाधिक तीन वेळा पाच बळी टिपण्याची कामगिरी भारताकडून जवागल श्रीनाथने केली होती.
जसप्रीत बुमराहने कसोटीत सात वेळा पाच बळी टिपले आहेत. उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने सातही वेळा परदेशात ही कामगिरी केली आहे. भारताकडून याबाबचा विक्रम कपिल देव यांच्या नावे आहे. त्यांनी परदेशात १२ वेळा डावात पाच बळी टिपले होत. तर इशांत शर्माने ९ वेळा, झहीर खानने ८ वेळा ही कामगिरी केली आहे. जसप्रीत बुमराहने दक्षिण आफ्रिकेत दोन वेळा, वेस्ट इंडिजमध्ये दोन वेळा, इंग्लंडमध्ये दोन वेळा तर ऑस्ट्रेलियात एकदा डावात ५ बळी टिपले आहेत.