भारत पाकिस्तानमध्ये रविवारी टी 20 वर्ल्ड कप सामना खेळविण्यात आला. या सामन्यात वेगवान गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदीनं रोहित शर्मा, के एल राहुल यांचे स्वस्तात बळी घेत भारताला बॅकफुटवर नेऊन ठेवले. नंतर विराट कोहलीलाही आऊट केले.
पाकिस्तानच्या विजयाचा शिल्पकार ठरलेला हा आफ्रिदी कसा गोलंदाजी करतो, त्याची शैली काय याबाबत भारतीय धुरंदर गाफील राहिले आणि तिथेच घात झाला. भारताने सामना एकही विकेट न घेता गमावला.
भारतीय संघाच्या आणि चाहत्यांच्या हा लाजिरवाना पराभव जिव्हारी लागला. नवख्या गोलंदाजासमोर भारतीय संघ नांग्या टाकतो हा इतिहास आहे. परंतू, दोन वर्षांपेक्षा जास्त काळानंतर एखाद्या संघाविरोधात खेळणे किती धोक्याचे ठरू शकते हे कालच्या सामन्याने दाखविले आहे.
शाहिन शाह आफ्रिदीनं ( Shaheen Shah Afridi) पहिल्याच षटकात रोहितला टिपत भारताला जोरदार धक्का दिला. त्यानंतर के एल राहुललाही माघारी पाठविले. इथेच पाकिस्तान निम्मा डाव जिंकला होता. कारण पुढच्या फलंदाजांवर दबाव वाढला होता. यानंतर 19 व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीला मोठे शॉट खेण्यापासून परावृत्त करत पॅव्हेलियनमध्ये पाठविले.
पाकिस्तानच्या या स्टार गोलंदाजाने 31 धावांच्या बदल्यात 3 मोठे बळी टिपले. शाहीनची शैली किती घातक ठरू शकते याचा अंदाज त्याचे कोच अया अकबर युसाफाई यांच्या लक्षात आली होती.
आफ्रिदी जगातील सर्वश्रेष्ठ फलंदाजांच्या मनात कशाप्रकारे भीती निर्माण करू शकतो हे ओळखले. त्यांनी इंडियन एक्स्प्रेसला शाहिन आफ्रिदीच्या या टॉप सिक्रेटची माहिती दिली.
शाहिन आफ्रिदीचा खांदा, हात आणि मनगट एवढे लवचिक आहे, की तेच त्याच्या गोलंदाजीची ताकद आहे. बॉल फेकताना त्याचे मनगट शेवटच्या क्षणाला अशा प्रकारे वळते की असे वाटते त्याच्या हाताचा वेगळाच भाग आहे. जसे की खेळण्याला वेगळा भाग जोडण्यात आला आहे.
शेवटच्या क्षणाला त्याचे मनगट वळत असल्याने बॉलही चांगलाच स्विंग होतो. यामुळे फलंदाजाच्या ही बाब लक्षात येत नाही आणि तो फसतो. याचबरोबर आफ्रिदी त्याचा खांदा देखील जास्तीत जास्त वापरतो.
आफ्रिदीमध्ये एक कमतरता देखील होती. तो बॉल टाकण्यासाठी धावल्यानंतर लगेचच दमत होता. रन अपला त्याला समस्या येत होती. उंच खेळाडूसाठी त्याची पाऊले खूप महत्वाची असतात. जी कोणत्याही गोलंदाजाला त्रस्त करू शकतात. यावर खूप काम केल्याचे युसाफाई यांनी सांगितले.