भारतीय संघाने आघाडीचे ४ फलंदाज ६६ धावांवर गमावले असताना युवा फलंदाज इशान किशन ( Ishan Kishan) मैदानावर उतरला. त्याने हार्दिक पांड्यासोबत दमदार खेळ करून भारतीय चाहत्यांना धीर दिला. भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला.
रोहित शर्मा ( ११), विराट कोहली ( ४) व श्रेयस अय्यर ( १४) हे पहिल्या १० षटकांत माघारी परतले. पाकिस्तानी गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी आणि हॅरीस रौफ यांनी भारतीय संघाला धक्यांवर धक्के दिले. शुबमन गिलच्या ( १०) मागे अपयश कायम राहिले.
KL Rahulच्या जागी मिळालेल्या संधीचं इशाननं सोनं केलं अन् अर्धशतक झळकावले. वन डे क्रिकेटमध्ये सलग चार सामन्यात ५०+ धावा करणारा तो महेंद्रसिंग धोनीनंतर ( २०११) भारताचा पहिला यष्टिरक्षक-फलंदाज ठरला.
अर्धशतकानंतर इशानची गाडी सुसाट पळाली अन् चौकारांचा पाऊस सुरू झाला. इशान-हार्दिक जोडीने ११८ चेंडूंत शतकी भागीदारी पूर्ण केली. हार्दिकनेही ६२ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. पाकिस्तानविरुद्धच्या पहिल्याच वन डे सामन्यात ५०+ धावा करणआरा इशान हा नववा भारतीय फलंदाज ठरला. पण, युवराज सिंगनंतरचा पहिलाच डावखुरा फलंदाज बनला.
पाकिस्तानच्या क्षेत्ररक्षणात नंतर ढिसाळपणा आलेला दिसला. हॅरिसने ही भागीदारी तोडली अन् इशान ८१ चेंडूंत ९ चौकार व २ षटकारांसह ८२ धावांवर झेलबाद झाला.
हार्दिकसह त्याने १४१ चेंडूंत १३८ धावांची भागीदारी केली. पाकिस्तानविरुद्ध ही भारताच्या पाचव्या किंवा त्याखालच्या क्रमांकाच्या फलंदाजांनी केलेली सर्वोत्तम भागीदारी ठरली. या जोडीने राहुल द्रविड व मोहम्मद कैफ यांचा १३५ धावांचा ( २००५) विक्रम मोडला.