Join us

IND VS NZ: दुसऱ्या कसोटीतून अजिंक्य रहाणेचा पत्ता कट होणार?; राहुल द्रविडनं मांडलं त्याचं मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2021 11:30 IST

Open in App
1 / 12

कानपूरमध्ये खेळलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाचा हातचा विजय निसटून गेला. ९ गडी बाद केलेल्या टीम इंडियाला अखेरच्या ५२ चेंडूंमध्ये न्यूझीलंडची अखेरची विकेट घेण्यात अपयश आलं आणि पहिला सामना अनिर्णीत राहिला.

2 / 12

याशिवाय या सामन्यात पहिल्या डावात श्रेयस अय्यरनं शतकी खेळी केली, तर दुसऱ्या सामन्यातही अर्धशतक ठोकलं. परंतु त्याला दुसऱ्या कसोटी सामन्यात स्थान मिळेल का हा प्रश्न विचारला होता.

3 / 12

तसंच दुसऱ्या कसोटी सामन्यात विराट कोहली आणि रोहित शर्माचं संघात पुनरागम होणार असल्यानं अजिंक्य रहाणेलाही संधी मिळेल का हा प्रश्न विचारला जात होता. परंतु यावर आता भारतीय क्रिकेंट संघाचा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडनं प्रतिक्रिया दिली आहे.

4 / 12

रहाणेची कामगिरी हा भारतीय संघासाठी चिंतेचा विषय आहे का? असा प्रश्न द्रविडला विचारण्यात आला होता. 'यासाठी अधिक चिंता करण्याची गरज नाही. तुम्हालाही रहाणेनं अधिक धावा कराव्या असंच वाटत असेल आणि त्याला स्वत:लाही तेच वाटत असेल,' असं द्रविड यावर बोलताना म्हणाला.

5 / 12

'अजिंक्य रहाणे हा प्रतिभावंत खेळाडू आहे आणि यापूर्वी त्यानं भारतीय संघासाठी मोलाची कामगिरीही बजावली आहे. कौशल्य आणि अनुभव असणाऱ्या खेळाडूंपैकी तो एक आहे. केवळ एका सामन्याची गोष्ट आहे. हे त्यालाही समजतं आणि आपल्यालाही,' अशी प्रतिक्रियाही त्यानं यावेळी दिली.

6 / 12

कोहलीच्या पुनरागमनानंतर रहाणेला प्लेईंग इलेव्हनमध्ये स्थान देण्यासाठी श्रेयस अय्यरला बाहेर बसवलं जाईल का? असा सवाल त्याला करण्यात आला. 'प्लेईंग ११ काय असेल हे आम्ही ठरवलं नाही आणि आताच ते सांगणंही घाईचं ठरेल. आम्ही मुंबईला गेल्यावर परिस्थिती पाहू आणि फिटनेस तपासून पाहू,' असं त्यानं सांगितलं.

7 / 12

'दुसऱ्या सामन्यात कोहलीदेखील पुनरागमन करणार आहे. त्यामुळे त्याच्याशी चर्चा करणंही महत्त्वाचं आहे आणि त्यानंतरच कोणता निर्णय घेतला जाईल,' असंही द्रविडनं स्पष्ट केलं.

8 / 12

द्रविडनं अंडर १९ मधून ओळख तयार केलेल्या आणि कसोटी क्रिकेटमध्ये स्थान मिळवलेल्या श्रेयस अय्यरचंही कौतुक केलं. तसंच हे भारतीय क्रिकेटचं यश असल्याचं म्हटलं. 'युवा खेळाडू थेट पदार्पणाच्या सामन्यातच चांगली कामगिरी करतात हे पाहिल्यानं आनंद होतो. आम्ही टी २० मध्येही एक दोन खेळाडूंना पाहिलंय, ज्यांनी सुरूवातीच्याच सामन्यात उत्तम कामगिरी केली,' असंही द्रविड म्हणाला.

9 / 12

न्यूझीलंडविरूद्धचा पहिला कसोटी सामना भारतीय संघाच्या हातून थोडक्यात निसटला. भारतीय संघाला पाचव्या दिवसाच्या अखेरच्या षटकापर्यंत न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांनी झुंजवले. राचिन रविंद्रनं ९१ चेंडू म्हणजे जवळपास १५ षटकं खेळून काढताना किवींचा पराभव टाळला अन् टीम इंडियाला अनिर्णीत निकालावर समाधान मानण्यास भाग पाडले. राचिन व अजाझ पटेल यांनी ५२ चेंडू खेळून काढताना टीम इंडियाला शेवटची विकेट घेऊ दिली नाही.

10 / 12

पदार्पणवीर श्रेयस अय्यरनं ( Shreyas Iyer) मिळालेल्या संधीचं सोनं करताना पहिल्या डावात शतक व दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावून दमदार कामगिरी केली. अक्षर पटेल ( Axar Patel) यानं पहिल्या डावात किवींना दणका दिला, वृद्धीमान सहा (Wridhiman Saha) वेदनेसह खेळला अन् अर्धशतक झळकावून संघाच्या खात्यात महत्त्वपूर्ण धावा जोडल्या.

11 / 12

आर अश्विन ( R Ashwin) यानं अष्टपैलू कामगिरी केली. रवींद्र जडेजानं ( Ravindra Jadeja) दुसऱ्या डावात सामन्याला कलाटणी दिली. पण, भारताला विजय मिळवता आला नाही.

12 / 12

भारतीय खेळाडूंनी चौथा दिवस गाजवला. ५ बाद ५१ धावांवरून टीम इंडियानं ७ बाद २३४ धावांवर डाव घोषित केला. न्यूझीलंडची दुसऱ्या डावाची सुरूवात काही खास झाली नाही. परंतु अखेरच्या सत्रात भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंनी उत्तम खेळी करत भारताला विजयापासून दूर ठेवलं आणि सामना अनिर्णीत राहिला.

टॅग्स :अजिंक्य रहाणेराहुल द्रविड
Open in App