न्यूझीलंड विरुद्धच्या कसोटी मालिकेला २५ नोव्हेंबर पासून सुरूवात होणार आहे. कानपूरमध्ये पहिली कसोटी खेळवली जाणार आहे आणि कसोटी सामन्याला सुरुवात होण्याआधीच राहुल द्रविडनं मोठा निर्णय घेतला आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार कसोटी सामन्यात भारतीय संघाची सलामीवीर जोडी आता बदलणार आहे. सलामीवीर म्हणून फ्लॉप ठरलेल्या शुबमन गिल याला आता सलामीला न पाठवता मधल्या फळीत फलंदाजीला पाठवण्याचा राहुल द्रविडचा विचार आहे.
भारतीय संघाच्या सलामीवीर जोडीची जबाबदारी आता केएल राहुल आणि मयांक अग्रवाल यांच्याकडे देण्याचा निर्णय राहुल द्रविडनं घेतल्याचं सांगितलं जातं आहे. कसोटी मालिकेत रोहित शर्माला आराम देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे सलामीजोडीत बदल करण्यात येणार आहे.
रोहित शर्माला कसोटी मालिकेत आराम देण्यात येणार असल्यामुळे त्याच्या जागी मयांक अग्रवाल याला संधी मिळू शकते. इंग्लंड दौऱ्यात मयांक अग्रवाल यानं फक्त एकच सामना खेळला होता. रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी ओपनिंग केली होती. शुबमन गिल दुखापतग्रस्त झाल्यानं भारतात परतला होता.
शुबमन गिल एक गुणवान खेळाडू यात काहीच शंका नाही. पण एक सलामीवीर फलंदाज म्हणून त्याच्यात काही कमतरता भासत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे तो मधल्या फळीत चांगला खेळू शकतो अशी द्रविडची धारणा असल्याचं सांगितलं जात आहे.
शुबमन गिलनं आतापर्यंत ८ कसोटी सामन्यांमध्ये ३१.८४ च्या सरासरीनं ४१४ धावा केल्या आहेत. यात ३ अर्धशतकांचा समावेश आहे. गिल सुरुवातीच्या षटकांमध्ये स्विंग गोलंदाजीवर अडखळताना दिसून आला आहे. पण फिरकीपटूंविरोधात तो चांगली फलंदाजी करतो. त्यामुळे राहुल द्रविडनं शुबमन गिल याला मधल्या फळीत खेळवण्याचा विचार केल्याचं म्हटलं जात आहे.
न्यूझीलंड विरुद्धच्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीला देखील आराम देण्यात आला आहे. यात अजिंक्य रहाणे संघात चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला दिसू शकतो. तर शुबमन गिल पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो.
शुबमन गिल मधल्या फळीत गेल्यामुळे सलामीसाठी मयांक अग्रवाल याचा मार्ग मोकळा होणार आहे. जबरदस्त फॉर्मात असूनही मयांक अग्रवाल संघाबाहेर आहे. आता संघात पुनरागमन करुन पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी अग्रवाल याला मिळणार आहे.
अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, केएल राहुल, मयांक अग्रवाल, शुबमन गिल, श्रेयस अय्यर, वृद्धीमान साहा, केएल भरत, रवींद्र जडेजा, आर.अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, इशांत शर्मा, उमेश यादव, मोहम्मद सिराज आणि प्रसिद्ध कृष्णा (विराट कोहली दुसऱ्या कसोटीपासून भारतीय संघात सहभागी होईल)