India vs New Zealand 1st T20I : राहुल द्रविड नव्या इनिंगसाठी सज्ज झाला आहे. रवी शास्त्री यांच्या मुख्य प्रशिक्षकपदाच्या कार्यकाळात टीम इंडियानं अनेक ऐतिहासिक विजय मिळवले, परंतु भारताच्या आयसीसी स्पर्धा विजयाची पाटी कोरी राहिली. त्यामुळे नवीन प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया २०१३पासूनचा आयसीसी स्पर्धा जेतेपदाचा दुष्काळ संपवेल अशी इच्छा व्यक्त केली जात आहे. त्यादृष्टीनं राहुल द्रविडनंही पाऊलं टाकली आहेत आणि आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२२साठी त्यानं विजायासाठीचे पाच फॉर्म्युले तयार केले आहेत. द्रविडच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडिया पहिल्याच मालिकेत न्यूझीलंडचा सामना करणार आहे. रोहित शर्माकडेही आता फुल टाईम ट्वेंटी-२० संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवली गेली आहे.
नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत भारतीय संघाला अपयश आलं आणि त्यामुळे खेळाडूंवर किंचितसे दडपण आहे. पण, राहुल द्रविडनं खेळाडूंमध्ये गमावलेला आत्मविश्वास पुन्हा निर्माण केला आहे आणि बिनधास्तपणे खेळण्याचा सल्ला दिला आहे. ''ट्वेंटी-२० फॉरमॅटमध्ये मैदानावर उतरून बिनधास्त खेळणं महत्त्वाचे आहे आणि पण, असं करताना प्रत्येकवेळी यश येईलच असं नाही. पण तुम्हाला स्वतःला आव्हान देत राहायला हवं. अपयशी ठरला तरी संघातील स्थान जाणार नाही, याची खात्री खेळाडूंमध्ये निर्माण केली गेली आहे. मी आणि द्रविड याच दृष्टीनं काम करतोय,''असे रोहित शर्मानं पत्रकार परिषदेत सांगितले होते.
ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील अपयशानंतर खेळाडूंच्या थकव्याचा प्रश्न चर्चेत आला. नवीन मुख्य प्रशिक्षक द्रविड यानंही या समस्येवर लक्ष वेधताना खेळाडूंना विश्रांती दिली जाईल असे संकेत दिले. त्यानं संघातील प्रत्येक खेळाडूशी वन ऑन वन चर्चा केली आणि बायो बबलमुळे येणाऱ्या थकव्याबद्दल माहिती घेतली. खेळाडूंना या थकव्यातून विश्रांती देण्यासाठी रोटेशन केलं जाईल आणि त्यांच्यावर कोणताच ताण पडणार नाही, याची काळजी घेतली जाईल. असे द्रविडनं स्पष्ट केलं.
अंतिम ११मध्ये भारतीय संघ खेळाडूला विशेष जबाबदारी देण्यापासून चुकत आला आहे. २०१९च्या वर्ल्ड कप स्पर्धेत चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजानं निवड समितीला हैराण केलं होतं, तर ट्वेंटी-२० वर्ल्ड कपमध्ये अष्टपैलू खेळाडूची उणीव जाणवली. हार्दिक पांड्यानं निराश केलं. आता पुढील वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेऊन द्रविड व रोहित शर्मा ही जोडी खेळाडूंना त्यांची जबाबदारी नीट समजावून सांगणार आहेत.
राहुल द्रविडनं नेहमीच संघाला महत्त्व दिले आहे आणि आता तो टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूकडून अशीच अपेक्षा करतोय.
युवा व अनुभवी खेळाडूंची योग्य सांगड घालण्याचा राहुल द्रविडचा प्रयत्न असणार आहे. भारतीय संघात फार कमी खेळाडूंना दीर्घ काळ खेळण्याची संधी मिळते अशात राहुल द्रविड संघ व्यवस्थापनाची ही चूक सुधारण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यामुळे संघ व खेळाडूंसाठी दीर्घकालीय योजना त्याच्या डोक्यात आहे.