India Tour of South Africa : राहुल द्रविड ( Rahul Dravid) मुख्य प्रशिक्षकपदावर विराजमान झाल्यानंतर टीम इंडियात सकारात्मक बदल पाहायला मिळत आहेत. संघात पदार्पण करणाऱ्या खेळाडूला माजी खेळाडूंच्या हस्ते पदार्पणाची कॅप देण्याची परंपरा द्रविडनं पुन्हा सुरू केली.
माजी प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी ही परंपरा सुरू केली होती, परंतु रवी शास्त्री व विराट कोहली यांच्या कार्यकाळात त्यात खंड पडला. त्यानंतर द्रविडनं कानपूर कसोटीनंतर ग्राऊंड्समनला स्वतःच्या खिशातील ३५ हजार दिले. हिच परंपरा टीम इंडियानं मुंबई कसोटीत कायम राखली. आता कुंबळे यांनी सुरू केलेली आणखी एक परंपरा द्रविड सुरू करणार आहे. त्यामुळे IPL मधील कामगिरीच्या जोरावर टीम इंडियात प्रवेश मिळवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूंना धक्का बसणार आहे.
तंदुरुस्तीच्या किंवा खराब फॉर्मामुळे संघाबाहेर होणाऱ्या खेळाडूंनी स्थानिक क्रिकेट खेळून पुनरागमनासाठी स्वतःला सिद्ध करण्याची परंपरा कुंबळे यांनी सुरु केली होती. पण, सततच्या मालिकांमुळे शास्त्री- विराट जोडीला ही परंपरा कायम राखता आली नाही.
हार्दिक पांड्याच्या निवडीवरुन सुरू असलेल्या वादामुळे आता द्रविड पुन्ही तिच परंपरा सुरू करणार आहे. बीसीसीआयच्या अधिकाऱ्याच्या मते भारतीय संघात पुनरागमन करण्यासाठी विशेषतः कसोटी संघातील खेळाडूनं स्थानिक क्रिकेट खेळणं गरजेचं आहे, याबाबत द्रविडची भूमिका स्पष्ट आहे.
''ही पॉलिसी होतीच, परंतु त्याचे काटेकोरपणे पालन केले गेले नाही. पण, आता द्रविडनं खेळाडूंना संघात स्थान मिळवायचे असेल, तर स्थानिक क्रिकेट खेळावेच लागेल, हे अनिवार्य केले आहे. हे खूप सोपं आहे, जर तुम्ही दुखापतीमुळे संघाबाहेर गेला असाल आणि त्यातून बरे झाल्यानंतर स्थानिक क्रिकेटमध्ये चांगला खेळ करून स्वतःची तंदुरुस्ती सिद्ध करावी लागणार आहे,''असे बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं InsideSport शी बोलताना सांगितले.
आयपीएलच्या कामगिरीवर निवड करण्याची परंपरा द्रविडला बदलायची आहे. कसोटी संघासाठीच्या निवडीत आयपीएलच्या कामगिरीचा विचार केला जाणार नाही. त्यामुळे ज्या खेळाडूंना पुनरागमन करायचे आहे, त्यांनी स्थानिक क्रिकेट खेळलेच पाहिजे. आता हार्दिक पांड्याला पुनरागमन करायचे असेल, तर त्याला रणजी करंडक स्पर्धेत खेळावे लागेल. त्यानं विजय हजारे ट्रॉफीतून माघार घेतली आहे आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेसाठी तो पात्र ठरत नाही.