भारतासाठी 'करा किंवा मरा'ची स्थिती! तिसऱ्या ट्वेंटी-२० सामन्यात हार्दिकसेनेची 'अग्निपरीक्षा'

IND vs WI 3rd T20 : वेस्ट इंडिजविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघ आताच्या घडीला 'करा किंवा मरा'च्या स्थितीत आहे.

वेस्ट इंडिजविरूद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत भारतीय संघ आताच्या घडीला 'करा किंवा मरा'च्या स्थितीत आहे. मालिकेतील सुरूवातीचे दोन सामने जिंकून यजमान संघाने २-० अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे टीम इंडियासमोर आगामी सामन्यात मोठे आव्हान असणार आहे.

तिसऱ्या सामन्यातील विजय वेस्ट इंडिजच्या संघाला मालिका जिंकवून देईल, तर पराभव पाहुण्या भारतीय संघाला मालिका गमवायला लावेल. मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाला उरलेले तिन्ही सामने जिंकावे लागणार आहेत.

आगामी तिसरा सामना मंगळवारी होणार असून या 'फायनल' सामन्याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर भारतीय कर्णधार हार्दिक पांड्याने फलंदाजांवर खापर फोडले होते. आम्ही आणखी १०-१५ धावा करायला हव्या होत्या असे हार्दिकने म्हटले.

२०१६ मध्ये शेवटच्या वेळी भारताचा वेस्ट इंडिजकडून द्विपक्षीय ट्वेंटी-२० मालिकेत पराभव झाला होता. पाच सामन्यांच्या मालिकेतील पहिले दोन सामने गमावल्यानंतर भारत ०-२ ने पिछाडीवर आहे.

ट्वेंटी-२० स्पेशालिस्ट म्हणून विडिंजच्या संघाची ओळख आहे. या फॉरमॅटमध्ये फलंदाजांना पहिल्या चेंडूपासूनच आक्रमकपणे खेळावे लागते परंतु आतापर्यंत भारताचे आघाडीचे फलंदाज इशान किशन, शुबमन गिल आणि सूर्यकुमार यादव यांना अशी खेळी करण्यात अपयश आले आहे.

आघाडीचे फलंदाज अपयशी ठरत असल्यामुळे संजू सॅमसन आणि तिलक वर्मा यांच्यावर दबाव वाढत आहे. तिलक वर्माने मात्र दोन्हीही सामन्यांमध्ये (३९) आणि (५१) अशी साजेशी खेळी केली.

रविवारी झालेल्या दोन विकेट्सच्या पराभवानंतर हार्दिक म्हणाला की, भारतीय फलंदाजांना अधिक जबाबदारीने खेळावे लागेल.

सध्या फॉर्ममध्ये असलेला फिरकीपटू कुलदीप यादव अंगठ्याच्या दुखापतीमुळे संघाबाहेर आहे. पण, तिसऱ्या सामन्यात तो खेळणार का हे पाहण्याजोगे असेल.

दोन महिन्यांनंतर खेळत असलेला युझवेंद्र चहल प्रभावी ठरला पण रवी बिश्नोईला काही अप्रतिम करता आले नाही. वेगवान गोलंदाज मुकेश कुमारने खूप धावा दिल्या, त्यांच्या जागी आवेश खान किंवा उम्रान मलिकला संधी दिली जाऊ शकते.

पाच सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाला सलग दुसऱ्या पराभवाचा सामना करावा लागला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय कर्णधार हार्दिक पांड्याला भोवला.

पण, तिलक वर्माने अर्धशतक झळकावून संघाची लाज राखली. टीम इंडियाने निर्धारित २० षटकांत ७ बाद १५२ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात, १५३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वेस्ट इंडिजच्या संघाने १८.५ षटकांतच लक्ष्य गाठले अन् २ गडी राखून विजय मिळवला.