Prasidh Krishna, IND vs WI, 2nd ODI Live Updates : भारतीय संघाने दुसऱ्या वन डे सामन्यात ४४ धावांनी विजय मिळवून वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेत २-० अशी विजयी आघाडी घेतली. भारताने वेस्ट इंडिजविरुद्ध मागील ११ वन डे सामन्यांत विजय मिळवला आहे. २००६ मध्ये त्यांना विंडीजकडून अखेरचा मालिका पराभव पत्करावा लागला होता.
भारताने २००७ ते २०२२ पर्यंत वेस्ट इंडिजविरुद्ध सलग ११ वन डे मालिका जिंकल्या आहेत आणि यासह त्यांनी पाकिस्तानच्या विक्रमाशी बरोबरी केली. पाकिस्तानने १९९६ ते २०२१ या कालावधीत झिम्बाब्वे विरुद्ध ११ वन डे मालिका जिंकल्या आहेत.
लोकेश राहुल ( ४९) व सूर्यकुमार यादव ( ६४) यांनी फलंदाजी कमाल दाखवली, पण आजच्या विजयाचा स्टार ठरला तो गोलंदाज प्रसिद्ध कृष्णा... त्याने ९ षटकांत १२ धावा देताना सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या. त्याने तीन षटकं निर्धाव टाकली. म्हणून त्याला प्लेअर ऑफ दी मॅच म्हणून गौरविण्यात आले.
''अशी कामगिरी करण्यासाठी मी बऱ्याच काळापासून प्रयत्नशील होतो. आज त्याला यश मिळाल्याने आनंदीत आहे. त्यासाठी मी काही खास केले नाही, फक्त चेंडू योग्य टप्प्यावर टाकला. मी फलंदाजीला आलो तेव्हा चेंडू वळसा घेत होता, त्यामुळे मला गोलंदाजी कशी करायला हवी याचा अंदाज आहे. आता सातत्यपूर्ण कामगिरी हेच लक्ष्य आहे,''असे प्रसिद्ध सामन्यानंतर म्हणाला.
भारतीय गोलंदाजाने मायदेशात ४ किंवा त्याहून अधिक विकेट घेत सर्वात कमी धावा देण्याचा विक्रम प्रसिद्धच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याने १२ धावा देताना ४ विकेट घेतल्या.
वन डे क्रिकेटमध्ये किमान ९ षटकं फेकल्यानंतर कमी धावा देणाऱ्या भारतीय जलदगती गोलंदाजांमध्ये प्रसिद्धने दुसरे स्थान पटकावले. जवागल श्रीनाथने २००३ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध १० षटकांत १३ धावांत ३ विकेट्स घेतल्या होत्या. त्यात २ निर्धाव षटकं होती.
वेस्ट इंडिजविरुद्ध वन डे सामन्यातील भारताच्या जलदगती गोलंदाजाची ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. संजीव शर्मा यांनी १९८८मध्ये २६ धावांत ५ विकेट्स घेतल्या होत्या. त्यानंतर प्रसिद्धच्या ( ४-१२) व मोहम्मद शमी ( ४-१६, २०१९ ) यांचा विक्रम येतो.
वन डे सान्यात किमान ४ विकेट्स घेतल्यानंतर सर्वात कमी धावा देणाऱ्या भारतीय जलदगती गोलंदाजांमध्ये प्रसिद्ध तिसऱ्या क्रमांकावर आला आहे. स्टुअर्ट बिन्नीने २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्ध ( ४ धावा) आणि भुवनेश्वर कुमारने २०१३ साली श्रीलंकेविरुद्ध ( ८) वरचढ कामगिरी केली होती.
वन डे क्रिकेट कारकीर्दित पहिल्या ६ सामन्यांत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या भारतीय गोलंदाजाचा विक्रम आता प्रसिद्धच्या नावावर नोंदवला गेला आहे. त्याच्या नावावर ६ वन डे सामन्यांत १५ विकेट्स झाल्या आहेत. त्याने १९८८मध्ये नरेंद्र हिरवाणी यांनी नोंदवलेला १४ विकेट्सचा विक्रम मोडला. अजित आगरकर ( १९९८), प्रविण कुमार ( २००७-०८) आणि जसप्रीत बुमराह ( २०१६) यांनीही पहिल्या सहा वन डे सामन्यांत प्रत्येकी १४ विकेट्स घेतल्या होत्या.