भारत आणि श्रीलंका यांच्यात सुपर ४ फेरीतील सामना आज खेळवला जाणार आहे. दोन्ही संघांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण सामना असल्याने ही लढत अटीतटीची होण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून पराभूत झाल्याने भारतीय संघासाठी हा सामना एखाद्या उपांत्य लढतीसारखाच आहे. श्रीलंकेच्या संघात मोठे स्टार खेळाडू नाही आहेत. मात्र गेल्या दोन सामन्यात या संघाने जबरदस्त कामगिरी केली आहे. श्रीलंकेच्या संघातील काही खेळाडू भारतीय संघाचं टेन्शन वाढवू शकतात.
दसून शणाका याच्या नेतृत्वाखालील श्रीलंकेच्या संघात युवा आणि नवोदित खेळाडूंचा भरणा आहे. श्रीलंकेने सुपर ४ मधील पहिला सामना जिंकला आहे. अशा परिस्थितीत भारतीय संघावर दबाव असेल.
वनिंदू हसरंगा वनिंदू हसरंगा हा श्रीलंकेच्या फिरकी गोलंदाजीचा कणा आहे. २५ वर्षांचा हा गोलंदाज आपल्या फिरकी गोलंदाजीच्या बळावर एकहाती सामना फिरवू शकतो. त्याने आतापर्यंक ४१ टी-२० सामन्यांमध्ये ६५ बळी टिपले आहेत.
२२ वर्षीय ऑफस्पिनर महिश तीक्षणाचं नाव टी-२० क्रिकेटमध्ये गेल्या काही काळापासून गाजत आहे. आयपीएलनमध्ये चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळताना त्याने ९ सामन्यांत १२ बळी टिपले होते. टी-२० आंतरराष्ट्रीयमध्ये त्याने २१ सामन्यात १८ बळी टिपले आहेत. मात्र त्याचा इकॉनॉमी रेट ७ पेक्षा कमी आहे.
श्रीलंकेचा यष्टीरक्षक भानुका राजपक्षे स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. तो २४ टी-२० खेळला असून, त्याचा स्ट्राईक रेट हा १३७ एवढा आहे.
श्रीलंकेचा सलामीवीर कुशल मेंडिस हा सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने बांगलादेशविरुद्ध ६० आणि अफगाणिस्तानविरुद्ध ३६ धावांची खेळी करून आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता.
पमुथ निसांका, कुशल मेंडिस (यष्टीरक्षक), चरित असलंका, दानुष्का गुणतिलका, भानुका राजपक्षे, दासून शणाका (कर्णधार), वनिंदू हसरंगा, चमिका करुणारत्ने, महिश तीक्षणा, असित फर्नांडो, दिलशान मदुशंका