श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना २०६ धावांचा डोंगर उभा केला, परंतु भारताला १९० धावांपर्यंतच मजल मारता आली. भारताचे आघाडीचे पाच फलंदाज ५७ धावांवर माघारी परतले होते. सूर्यकुमार यादव व अक्षर पटेल यांनी ९१ धावांची भागीदारी करताना विजयाच्या आशा जीवंत ठेवल्या होत्या. पण, आशियाई चॅम्पियन श्रीलंकेने बाजी मारली.
भारतीय संघ आता युवा खेळाडूंसह ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये पुढे जाण्याचा विचार करत आहे. अशात रोहित शर्मा ( Rohit Sharma) व विराट कोहली ( Virat Kohli) आदी वरिष्ठ खेळाडूंचे ट्वेंटी-२० संघाचे दरवाजे बंद झाल्यात जमा असल्याची चर्चा आहे. यावर मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड ( Rahul Dravid) याने महत्त्वाचे विधान केले आहे.
टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी विराट आणि रोहित यांच्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील भविष्याबाबत मोठे संकेत दिले आहेत. द्रविडचा असा विश्वास आहे की, आम्ही ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वेगवेगळ्या खेळाडूंना खेळवू पाहत आहोत आणि युवा खेळाडूंसह बलाढ्य श्रीलंकेच्या संघासमोर खेळणे हा एक चांगला अनुभव आहे.
विशेष म्हणजे या वर्षी आयसीसी वनडे वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे. ज्यासाठी बीसीसीआयने आधीच सांगितले होते की आता युवा खेळाडूंना ट्वेंटी-२० टीम इंडियामध्ये संधी दिली जाईल, तर रोहित शर्मा आणि विराट कोहली सारख्या वरिष्ठ खेळाडूंना फक्त वन डे क्रिकेटवर लक्ष केंद्रित करावे लागेल. अशा परिस्थितीत आता रोहित आणि कोहलीसाठी ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय सामन्याचे दरवाजे बंद होताना दिसत आहेत. कारण २०२४मध्ये ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे, त्यासाठी अजून बराच वेळ बाकी आहे.
टीम इंडियाचे प्रशिक्षक राहुल द्रविड श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या सामन्यानंतर पत्रकार परिषदेत म्हणाले, “गेल्या आयसीसी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या उपांत्य फेरीत खेळणाऱ्या टीम इंडियातील प्लेइंग इलेव्हन आणि या मालिकेत खेळणाऱ्या प्लेइंग इलेव्हन बदल आहे. या इलेव्हनमध्ये वर्ल्ड कप स्पर्धेतील फक्त तीन ते चार खेळाडू खेळताना दिसत आहेत. आम्ही आता ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये वेगळ्या तरुण गटाकडे आणि नवीन टप्प्याकडे पाहत आहोत.''
''आमच्या युवा संघाने बलाढ्य श्रीलंकेविरुद्ध दमदार कामगिरी केली. त्यांच्यासाठी हा एक चांगला अनुभव आहे. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे आमचं वन डे वर्ल्ड कप आणि जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेवरही लक्ष आहे. म्हणूनच तरुणांना संधी देण्यासाठी ट्वेंटी-२० क्रिकेट ही योग्य वेळ आहे,' असेही द्रविड म्हणाला.
द्रविड पुढे म्हणाला, 'आमचे युवा खेळाडू सुधारत आहेत. आम्ही कठोर परिश्रम घेत आहोत आणि त्यांना पाठिंबा देऊन त्यांना तांत्रिकदृष्ट्या मदत करण्याचा प्रयत्न करत आहोत. तुम्हाला माहिती आहे की आम्ही खेळाडूंना सर्वोत्तम वातावरण देण्याचा प्रयत्न करतो.'