पृथ्वी शॉ व संजू सॅमसन यांनी दमदार खेळी करताना अनुक्रमे 49 व 46 धावा केल्या. या दोघांचेही अर्धशतक हुकले. सूर्यकुमार यादव आणि मनिष पांडे खेळपट्टीवर असताना पावसाची बॅटिंग सुरू झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे खेळ थांबला तेव्हा भारतानं 23 षटकांत 3 बाद 147 धावा केल्या होत्या.
भारतीय संघानं तिसऱ्या वन डेत संजू सॅमसन, नितीश राणा, चेतन सकारीया, के गोवथम आणि राहुल चहर यांना पदार्पणाची संधी दिली. शिखर धवनने खणखणीत चौकार खेचून टीम इंडियाला आक्रमक सुरुवात करून देण्याचा प्रयत्न केला, परंतु 13 धावांवर त्याला माघारी जावे लागले.
त्यानंतर पदार्पणवीर संजू सॅमसन आणि पृथ्वी शॉ यांनी दुसऱ्या विकेटसाठी 74 धावा जोडल्या. या दोघांनी श्रीलंकेच्या गोलंदाजांचा चांगला समाचार घेतला. पृथ्वी मैदानाच्या चौफेर फटकेबाजी करत होता, तर पदार्पणवीर संजूची फटक्यांची नजाकत पाहून चाहते आनंदी झाले.
पृथ्वी 49 चेंडूंत 8 चौकारांसह 49 धावांवर पायचीत झाला. संजूनेही सुरेख फटकेबाजी केली अन् प्रविण जयविक्रमा गोलंदाजीवर एक्स्ट्रा कव्हरला उभ्या असलेल्या असलेल्या खेळाडूच्या डोक्यावरून चेंडू काढण्याचा प्रयत्न फसला. फर्नांडोनं हवेत झेपावत सुरेख झेल टिपून संजूला 46 धावांवर ( 5 चौकार व 1 षटकार) माघारी जावं लागलं.
आजच्या सामन्यात इशान किशनला विश्रांती देऊन संजू सॅमसनला प्लेईंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळाली अन् जेव्हा संजू बाद होऊन तंबूत परतला तेव्हा इशाननं त्याच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. इशानची ही खिलाडूवृत्ती सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरली आहे.