भारतीय संघ १४ नोव्हेंबरपासून कोलकात्यातील ईडन गार्डन्स स्टेडियमवर दक्षिण आफ्रिकेशी कसोटी मालिकेला खेळणार आहे. पण भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीचे हे घरचे मैदान असूनही त्याला संघाबाहेर ठेवण्यात आले आहे.
२०२३च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलनंतर शमीने एकही कसोटी सामना खेळलेला नाही. फायनलमधील दुखापतीनंतर तो संघाबाहेरच आहे. त्याच्या तंदुरुस्तीबाबत सातत्याने साशंकता व्यक्त केली जात आहे.
२०२५ च्या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये तो पुन्हा मैदानात उतरला आणि चांगली गोलंदाजी केली, परंतु त्यानंतरही शमीला फारशी संधी मिळत नाहीये. यावर अनेक चर्चा रंगल्या, पण आता खुद्द कर्णधार शुभमन गिलने पहिल्यांदाच यावर भाष्य केले आहे.
सामन्याच्या एक दिवस आधी आज गिलने पत्रकार परिषदेत अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. यातील एक प्रश्न शमीला वगळण्याबाबतच्या वादाशी संबंधित होता. तेव्हा भारतीय कर्णधाराने आपली रोखठोक भूमिका स्पष्टपणे मांडली.
शुबमन गिल म्हणाला, 'संघनिवडीच्या मुद्द्यावर मी उत्तर देऊ शकत नाही, सिलेक्टर्स याबद्दल तुम्हाला चांगल्या प्रकारे समाजवून सांगतील. मोहम्मह शमीच्या क्षमतेचे गोलंदाज आपल्याकडे फारसे नाहीत हेदेखील मला मान्य आहे.'
'पण आकाश दीप आणि प्रसिद्ध कृष्णा यांच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करू शकत नाही. आपण आगामी मालिका कुठे खेळणार आहोत याचा विचार करूनच कामगिरीवर लक्ष ठेवले जाते. त्यामुळे कठोर निर्णय घेतले जातात,' असे गिल म्हणाला.