IND vs SA Test Series : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या कसोटी मालिकेला २६ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. सेंच्युरियवर ही बॉक्सिंग डे कसोटी खेळवली जाणार आहे. भारतीय संघ सेंच्युरियन पार्कवर २०१० व २०१८ मध्ये कसोटी सामना खेळला अन् दोन्ही वेळेत दक्षिण आफ्रिकेनं बाजी मारली.
२०१०मध्ये दक्षिण आफ्रिकानं एक डाव व २५ धावांनी महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या टीम इंडियावर विजय मिळवला होता. २०१८मध्ये विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला येथे १३५ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. या मालिकेत कर्णधार विराट कोहली याच्यासह आर अश्विन, चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांना मोठे विक्रम खुणावत आहेत.
चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे हे सध्या फॉर्मात नाहीत आणि दक्षिण आफ्रिका दौरा ही त्यांच्यासाठी शेवटची संधी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ही दोघंही दमदार कामगिरी करून टीकाकारांची तोंड बंद करण्यासाठी सज्ज झाली आहेत. दोघांनाही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत १००० धावा पूर्ण करण्याची संधी आहे.
चेतेश्वर पुजारानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध कसोटीत १४ सामन्यांत ३२.९५च्या सरासरीनं ७५८ धावा केल्या आहेत. त्यापैकी ४११ धावा या आफ्रिकेत झालेल्या ७ सामन्यांतून आल्या आहेत. त्यानं या मालिकेत २४२ धावा केल्यास तो १००० धावांचा पल्ला पार करेल.
अजिंक्य रहाणेनं आफ्रिकेविरुद्ध कसोटीत १० सामन्यांत ५७.३३ च्या सरासरीनं ३ शतकांसह ७४८ धावा केल्या आहेत. त्यापैकी २६६ धावा या आफ्रिकेतच केल्या आहेत. त्यानं आफ्रिकेत ३ सामन्यांत ५३.२०च्या सरासरीनं धावा केल्या आहेत आणि ९६ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरलीय.
भारताचा फिरकीपटू आर अश्विन यानं नुकतंच हरभजन सिंग याचा कसोटी विकेट्सचा विक्रम मोडला. आता त्याला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर आणखी विक्रम मोडण्याची संधी आहे. त्याच्या नावावर ४२७ कसोटी विकेट्स आहेत आणि त्यानं आणखी चार विकेट्स घेताच तो न्यूझीलंडचे दिग्गज सर रिचर्ड हॅडली यांच्या ४३१ विकेट्सच्या विक्रमाची बरोबरी करेल.
या मालिकेत अश्विननं १३ विकेट्स घेतल्यास तो कसोटीत सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ८व्या क्रमांकावर सरकेल. कपिल देव यांचा ४३४ कसोटी विकेट्सचा विक्रम मोडण्यासाठी त्याला ७ बळी टिपावे लागतील, मग तो भारताचा दुसरा यशस्वी गोलंदाज ठरेल. अश्विननं २०१७-१८मध्ये आफ्रिकेत दोन सामन्यांत ७ विकेट्स घेतल्या आहेत.
भारताचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी याला कसोटी क्रिकेटमध्ये २०० बळी पार करण्यासाठी पाच विकेट्स हव्या आहेत. त्यानं ५४ कसोटींत १९५ विकेट्स घेतल्या आहेत. शमीनं दक्षिण आफ्रिकेत ५ कसोटीत २१ विकेट्स घेतल्या आहेत. २०१७-१८च्या मालिकेत सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्यात तो तिसऱ्या क्रमांकावर होता. त्यानं ३ सामन्यांत १५ विकेट्स घेतल्या होत्या.
विराट कोहलीला कसोटी क्रिकेटमध्ये ८००० धावांचा पल्ला गाठण्यासाठी १९९ धावांची गरज आहे आणि त्याचवेळी त्याला दोन वर्षांपासून ७१वे आंतरराष्ट्रीय शतकही खुणावत आहे. कोहलीनं ९७ कसोटींत ५०.६५च्या सरासरीनं ७८०१ धावा केल्या आहेत.
दक्षिण आफ्रिकेविरूद्ध त्यानं १२ कसोटींत ५९.७२च्या सरासरीनं १०७५ धावा केल्या आहेत आणि त्यात ३ शतकांचा समावेश आहे. आफ्रिकेत त्याची ५ कसोटींत धावांची सरासरी ही ५५.८० इतकी आहे. त्यानं २ शतकांसह ५५८ धावा केल्या आहेत.