India vs South Africa T20I : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून सुरुवात होत आहे. पण, या सामन्याला सुरूवात होण्याआधी भारताला दोन मोठे धक्के बसले आहे. लोकेश राहुल आणि कुलदीप यादव यांनी दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे.
त्यामुळे युवा फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) या मालिकेत टीम इंडियाचे नेतृत्व सांभाळणार आहे, तर हार्दिक पांड्याला उप कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच संघाचे नेृत्वव सांभाळणाऱ्या रिषभ पंतवर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे, रिषभ पंत एका वर्षात टीम इंडियाचे नेतृत्व करणारा सहावा कर्णधार बनणार आहे. त्यातही विशेष बाब म्हणजे, या सर्व कर्णधारांनी राहुल द्रविडच्या कोचिंगमध्येच कर्णधारपदाची जबाबदारीही घेतली आहे. मागील एका वर्षात टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवलेल्या खेळाडूंबद्दल जाणून घेऊया...
रोहित शर्मा- विराट कोहलीने 2021 च्या T20 विश्वचषकानंतर राजीनामा दिल्यानंतर रोहित शर्माला T20 फॉरमॅटचा कर्णधार करण्यात आले. त्यानंतर रोहितकडे एकदिवसीय आणि कसोटी संघाचे कर्णधारपदही सोपवण्यात आले. सध्या रोहितला टी-20 मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.
विराट कोहली- स्टार फलंदाज विराट कोहलीने टी-20 विश्वचषकानंतर या फॉरमॅटमधील संघाचे कर्णधारपद सोडले. नंतर कोहलीला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद गमवावे लागले. त्याचबरोबर या वर्षाच्या सुरुवातीला कोहलीने कसोटी कर्णधारपदही सोडले होते.
अजिंक्य रहाणे- सध्या संघाबाहेर असलेला फलंदाज अजिंक्य रहाणेने नोव्हेंबरमध्ये न्यूझीलंडविरुद्धच्या कानपूर कसोटीत संघाचे नेतृत्व केले होते. पण, रहाणेचा इंग्लंडविरुद्धच्या एका कसोटी सामन्यासाठी कसोटी संघात समावेश करण्यात आलेला नाही.
शिखर धवन- सलामीवीर शिखर धवनने गेल्या वर्षी श्रीलंका दौऱ्यावर तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले होते. पण, या मालिके धवन टी-20 संघाबाहेर आहे.
केएल राहुल- स्टार फलंदाज केएल राहुलने गेल्या दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर भारतीय संघासाठी तीन एकदिवसीय आणि एका कसोटी सामन्यात संघाचे नेतृत्व केले होते. मात्र, कर्णधारपदाखाली राहुलची सुरुवात चांगली झाली नाही आणि चारही सामन्यांमध्ये भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
रिषभ पंत- यानंतर आता भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पाच ट्वेंटी-20 सामन्यांच्या मालिकेसाठी रिषभ पंतकडे नेतृत्व देण्यात आले आहे. लोकेश राहुलने दुखापतीमुळे मालिकेतून माघार घेतली आहे. हार्दिक पांड्याला उप-कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. पहिल्यांदाच संघाचे नेृत्वव सांभाळणाऱ्या रिषभ पंतवर आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.