IND vs PAK: भारताला पाकिस्तानविरूद्ध सामन्याआधी मोठा धक्का! स्टार खेळाडू पडला आजारी

Setback to Team India against Pakistan, IND vs PAK Champions Trophy 2025: भारताचा 'तो' खेळाडू आजारपणामुळे प्रक्टिस सत्रातही येऊ शकला नाही

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हायव्होल्टेज सामन्याला आता अवघा एक दिवस शिल्लक राहिला आहे. उद्या रविवारी, २३ फेब्रुवारीला दुबईच्या स्टेडियमवर भारतीय संघ पाकिस्तानशी दोन हात करणार आहे.

संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलेला हा दुबईमधील सर्वात मोठा क्रिकेट सामना होणार आहे. याचे कारण म्हणजे चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५चे यजमानपद पाकिस्तानकडे असूनही ते दुबईत खेळणार आहेत.

साखळी सामन्यात भारत आणि पाकिस्तानचे संघ एकमेकांशी भिडणार आहेत. दोन्ही संघ या सामन्यासाठी जोरदार तयारी करत असतानाच टीम इंडिया व चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.

टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-फलंदाज रिषभ पंत हा सामन्याच्या एक दिवस आधी आजारी पडला आहे. भारताकडे सध्या राहुलच्या रूपात एकच यष्टिरक्षक असल्याने पंतच्या आजारामुळे संघाचा ताण वाढला आहे.

भारतीय संघाचा उपकर्णधार शुभमन गिलने शनिवारी टीम इंडियाच्या सराव सत्रानंतर पत्रकार परिषदेत माहिती दिली की, पंत अचानक आजारी पडलाय, ज्यामुळे तो सराव सत्रात सहभागी होऊ शकला नाही.

शुबमन गिलने पत्रकार परिषदेत असेही सांगितले की रिषभ पंतला व्हायरल फिव्हर म्हणजे ताप आला होता. त्यामुळे त्याला थोडा अशक्तपणाही आला. परिणाम त्याला सराव सत्रातून विश्रांती देण्यात आली आहे.

पंतच्या अनुपस्थितीचा टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनवर परिणाम होणार, नाही कारण भारतीय संघात सध्या केएल राहुलला यष्टिरक्षक म्हणून पहिली पसंती आहे. तो बांगलादेशविरूद्धच्या सामन्यातही खेळला.

असे असूनही, पंत आजारी पडणे ही चिंतेची बाब आहे. कारण जर राहुलला सामन्यापूर्वी किंवा सामन्यादरम्यान काही झाले आणि पंतही तंदुरुस्त नसेल तर टीम इंडियाला यष्टीरक्षक निवडण्याची समस्या भेडसावेल.

या दोघांव्यतिरिक्त, भारतीय संघात तिसरा मुख्य यष्टिरक्षक नाही. अशा परिस्थितीत, भारतीय संघ आशा करेल की केएल राहुल पूर्णपणे तंदुरुस्त राहील, आणि त्यासोबतच पंतही लवकरात लवकर बरा होईल.