"सूर्यकुमारने माझ्याशी दोन वेळा हस्तांदोलन केले, पण जगासमोर..."; पाकिस्तानी कर्णधाराचा दावा

Pakistan Captain Salman on Suryakumar Yadav Handshake controversy IND vs PAK Asia Cup 2025 : "मला खात्री आहे की, सूर्यकुमारच्या मनात हस्तांदोलनाचा विचार होता," असेही सलमान अली आगा म्हणाला

टीम इंडियाने आशिया चषक २०२५चा अंतिम सामना जिंकला. पाकिस्तानला पराभूत करत भारताने सर्वाधिक वेळा नवव्यांदा आशिया चषक स्पर्धेचे विजेतेपद मिळवले.

प्रथम साहिबजादा फरहानच्या अर्धशतकामुळे पाकिस्तानने १४६ धावा केल्या. प्रत्युत्तरात तिलक वर्माच्या नाबाद अर्धशतकाच्या जोरावर भारताने सामना जिंकला.

भारताने स्पर्धा जिंकली, पाकिस्तानचे मंत्री आणि आशिया क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष मोहसीन नक्वी विजेतेपदाची ट्रॉफी देण्यासाठी उभे असल्याने भारताने ट्रॉफी स्वीकारली नाही.

याआधीही हस्तांदोलन करण्यावरून वाद रंगला होता. याच मुद्द्यावर स्पर्धा संपल्यानंतर पत्रकार परिषदेत पाकिस्तानी कर्णधार सलमान अली आगा याने एक खळबळजनक दावा केला.

तो म्हणाला, "या स्पर्धेत जे काही घडले ते खूपच निराशाजनक होते. हस्तांदोलन न करणे, ट्रॉफी न घेणे असा गोष्टी करून ते आमचा अपमान करत नव्हते, त्यांनी क्रिकेट या खेळाचा अपमान केला आहे."

"एखादा समंजस संघ काय करतो ते आम्ही दाखवले. मी ट्रॉफीच्या फोटोशूटला एकटा गेलो. आम्ही तेथे उभे राहून मेडल्सही स्वीकारली. पण त्यांनी जे केले ते खेळाच्या मैदानात साजेसे नव्हते."

"सूर्यकुमारने सुरुवातीला दोन वेळा माझ्याशी हस्तांदोलन केले होते. आम्ही जेव्हा कर्णधारांची पत्रकार परिषद घेतली तेव्हा त्याने मला हात मिळवला होता."

"त्यानंतर आमची रेफरींशी एक बैठक झाली होती. त्या मिटिंगमध्येही त्याने माझ्याशी हस्तांदोलन केले होते. पण जगासमोर मात्र त्यांनी हस्तांदोलन करणे टाळले."

"मला खात्री आहे की, सूर्यकुमारच्या मनात हस्तांदोलन करण्याचा विचार होता, पण त्याला वेगळे आदेश देण्यात आले होते, त्यामुळे त्याचाही नाईलाज झाला. माझा त्याच्यावर राग नाही," असे तो म्हणाला.