Join us
Daily Top 2Weekly Top 5

IND Vs NZ: न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रविंद्रचं सचिन तेंडुलकर- राहुल द्रविडशी आहे असं कनेक्शन, वाचून बसेल आश्चर्याचा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2021 15:00 IST

Open in App
1 / 8

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पहिल्या टी-२० सामन्यात भारतीय संघाने पाच विकेट्स राखून बाजी मारली. अखेरच्या षटकापर्यंत रंगलेल्या या सामन्यात विशेष लक्ष वेधून घेतले ते न्यूझीलंडचा युवा खेळाडू रचिन रवींद्र याने. या सामन्यात त्याला विशेष खेळी करता आली नसली तरी त्याच्याबाबत भारतीय क्रिकेटप्रेमींमध्ये उत्सुकता होती.

2 / 8

दरम्यान, न्यूझीलंडच्या संघातील भारतीय वंशाचा खेळाडू असलेल्या रचिन रवींद्रबाबत अजून काही आश्चर्यकारक माहिती समोर आली आहे. तसेच त्याच्या नावाचं सचिन आणि द्रविडच्या नावाशी असलेलं कनेक्शनही समोर आलं आहे.

3 / 8

न्यूझीलंडमध्ये भारतीय वंशाचे हजारो लोक स्थायिक झालेले आहेत. तसेच न्यूझीलंडच्या संघामधून दीपक पटेल, जतीन पटेल, ईश सोढी यांच्यासारखे भारतीय वंशाचे खेळाडू खेळे आहेत. दरम्यान, या यादीमधील पुढचं नाव आहे ते रचिन रवींद्र याचं.

4 / 8

रचिन रवींद्रचा आज जन्मदिन आहे. त्याचा जन्म १८ नोव्हेंबर १९९९ मध्ये न्यूझीलंडमधील वेलिंग्टनमध्ये झाला होता. त्याचे वडील रवी कृष्णमूर्ती आणि आई दीपा कृष्णमूर्ती हे रचिनच्या जन्मापूर्वी न्यूझीलंडमध्ये स्थायिक झाले होते.

5 / 8

रवी कृष्णमूर्ती आणि त्यांची पत्नी दीपा कृष्णमूर्ती हे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि राहुल द्रविड यांचे चाहते आहेत. रचिनचा जन्म झाला तेव्हा सचिन आणि राहुल द्रविड ऐन बहरात होते. त्यामुळे या दोघांच्या नावावरून आपल्या मुलाचे नामकरण करण्याचा त्यांनी निर्णय घेतला.

6 / 8

त्यानुसार राहुल द्रविडच्या नावामधून र आणि सचिनच्या नावातून चिन ही अक्षरे घेऊन त्यांनी आपल्या मुलाचे नाव रचिन असे ठेवले. मुलाचं असं नामकरण केलं तेव्हा त्यांना आपला मुलगा क्रिकेटपटू होईल, असे वाटले नव्हते. मात्र रचिनने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करत आई-वडिलांचं स्वप्न साकार केलं.

7 / 8

तसेच रचिन रवींद्रचे वडील रवी कृष्णमूर्ती हे भारताचा माजी गोलंदाज जवागल श्रीनाथचे चांगले मित्र आहेत. दोघेही एकत्र क्रिकेट खेळले आहेत. तसेच रचिनच्या क्रिकेटबाबत दोघांमध्ये चर्चा होत असते.

8 / 8

रचिनने सप्टेंबर २०२१ मध्ये बांगलादेशविरुद्ध झालेल्या पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेमधून आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. मात्र त्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली म्हणावी तशी छाप पाडता आलेली नाही. आतापर्यंत खेळलेल्या सहा टी-२० सामन्यांमध्ये त्याला केवळ ५४ धावाच जमवता आल्या आहेत.

टॅग्स :भारत विरुद्ध न्यूझीलंडटी-20 क्रिकेट
Open in App