३४५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचे सलामीवीर टॉम लॅथम व विल यंग यांनी पहिल्या विकेटसाठी १५१ धावांची भागीदारी केली. पण, तिसऱ्या दिवशी अक्षर पटेलनं त्यांना बॅकफूटवर फेकले. यंग ८९ आणि लॅथम ९५ धावांवर बाद झाले. त्यांच्यानंतर कायले जेमिन्सन ( २३) हा किवींकडून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. अक्षर पटेलनं ६२ धावांत ५ विकेट्स घेतल्या. आर अश्विननं ८२ धावांत ३ बळी टिपले.
अक्षर पटेलनं टीम इंडियाला सामन्यात कमबॅक करून दिले आणि अनेक विक्रम मोडले. अक्षरनं अवघ्या ७ डावांमध्ये पाचवेळा डावात ५ विकेट्स घेण्याचा पराक्रम केला. त्यानं चार्ली टर्नर ( १८८७-८८) व टॉम रिचर्डसन ( १८९३-९५) यांच्यांशी बरोबरी केली.
कारकिर्दीच्या पहिल्या चार कसोटीत भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणाऱ्या गोलंदाजांत अक्षरनं दुसरं स्थान पटकावताना आर अश्विनला मागे टाकले. नरेंद्र हिरवानी ३६ विकेट्ससह अव्वल स्थानावर आहे. अक्षरनं ३२* विकेट्स, तर अश्विननं २६ विकेट्स घेतल्या आहेत.
पण, अक्षर पटेलच्या इंग्रजी नावातील गम्मत तुम्हाला माहित्येय का? अक्षर त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवर त्याचं नाव Akshar असं लिहितो, परंतु त्याच्या जर्सीवर Axar अशी स्पेलिंग दिसते. आयपीएल २०१४मध्ये पंजाब किंग्स ( तेव्हाची किंग्स इलेव्हन पंजाब) संघाकडून खेळणाऱ्या अक्षरच्या नावानं असाच गोंधळ उडाला होता.
बीसीसीआयच्या रिलीजमध्येही त्याचं नाव Axar असेच दिसेल, परंतु सोशल मीडियावर तेच नाव Akshar असे दिसतेय. मग या खेळाडूचं खरं नाव काय आहे? मार्च २०२१मध्ये द हिंदूशी बोलताना अक्षरच्या कुटुंबीयांनी नावातील गोंधळामागची गोष्ट सांगितली.
ते म्हणाले,'दुधजन्य पदार्थांसाठी प्रसिद्ध असलेल्या आनंद या शहरात त्याचा जन्म झाला आणि नर्सनं त्याच्या जन्मदाखल्यावर त्याच्या नावाची स्पेलिंग Axar अशी लिहिली. अशा प्रकारे ही स्पेलिंग त्याच्यासोबत कायम राहिली. ''
आयपीएल २०१४मध्ये पंजाबकडून त्यानं १७ विकेट्स घेतल्या. त्यानंतर त्याची बांगलादेश दौऱ्यासाठी टीम इंडियात निवड झाली. २०१५च्या वर्ल्ड कप स्पर्धेतही तो संघाचा सदस्य होता, परंतु त्याला आयसीसी स्पर्धेत पदार्पण करता आले नाही. त्यानं ३८ वन डे व १५ ट्वेंटी-२० सामन्यांत प्रतिनिधित्व केले आहे. याच वर्षी त्यानं कसोटी संघात पदार्पण केले.
पहिल्या डावात ४९ धावांची आघाडी घेतल्यानंतर भारतीय संघाला पहिल्या कसोटीत मोठी आघाडी घेण्याची संधी होती. पण, भारताचा निम्मा संघ ५१ धावांवर माघारी पाठवून न्यूझीलंडनं यजमानांना दणका दिला. अजिंक्य रहाणे व चेतेश्वर पुजारा यांचा अपयशाचा पाढा याही सामन्यात कायम राहिला. चौथ्या दिवसाच्या लंच ब्रेकपर्यंत भारतानं ५ बाद ८४ धावा करून १३३ धावांची आघाडी घेतली आहे.