सध्या इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या भारतीय संघाने ऐतिहासिक कामगिरी करताना इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत दणदणीत विजय मिळवला. या विजयानंतर भारतीय संघानं विजयाचं जोरदार सेलिब्रेशन केलं. त्याचे फोटो आता मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत.
भारताने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत २-१ ने विजय मिळवत मालिकेवर कब्जा केला. यावेळी कर्णधार रोहित शर्माने विजेतेपदाची ट्रॉफी उचलण्याची संधी युवा गोलंदाज अर्शदीप सिंह याला दिली.
दरम्यान, विश्वविजेत्या इंग्लंडला त्यांच्याच घरात चितपट केल्यानंतर भारतीय संघाने जोरदार विजयोत्सव साजरा केला. कर्णधार रोहित शर्मा याला सहकाऱ्यांनी शॅम्पेनच्या बाटलीने स्नान घातले. तर सामन्याचा मानकरी ठरलेल्या रिषभ पंतने रोहित शर्मावर शॅम्पेनचे फवारे उडवले.
माजी कर्णधार विराट कोहलीसुद्धा या सेलिब्रेशनमध्ये मागे नव्हता. त्यानेही शॅम्पेनची मोठी बाटली उचलत खूप धमाल केली. शिखर धवन आणि सूर्यकुमार यादव यांनीही त्याला साथ दिली.
पहिल्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर दुसऱ्या लढतीत भारतीय संघाला पराभव पत्करावा लागला होता. दरम्यान, काल रात्री खेळवल्या गेलेल्या तिसऱ्या सामन्यात भारतीय संघाने ५ विकेट्सनी विजय मिळवत मालिका २-१ ने जिंकली.
भारतीय संघाने ८ वर्षांनंतर इंग्लंडमध्ये एकदिवसीय मालिका जिंकली. तर ३९ वर्षांनंतर मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्डच्या मैदानावर इंग्लंडला पराभूत केले.
भारतीय संघाला शेवटचा सामना जिंकण्यासाठी २६० धावांची गरज होती. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने ७१ आणि रिषभ पंतने नाबाद १२५ धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला.