भारतीय संघाने टी२० मालिकेतील पहिले दोन सामने जिंकले. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने मालिकेत २-१ असे अंतर गाठून मालिकेतील आव्हान जिवंत ठेवले.
इंग्लंडच्या संघाने तिसऱ्या टी२० सामन्यात प्रथम फलंदाजी करताना १७१ धावांची दमदार खेळी केली. अर्शदीप सिंगला दिलेली विश्रांती आणि पार्ट टाइम गोलंदाजाचा करावा लागलेला वापर यामुळे बॉलिंग फिकी पडली.
१७२ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना देखील भारतीय संघाची वरळी फळी गडगडली. अपेक्षित फटकेबाजीचा अभाव, चुकीच्या फटक्यांवर झेल देणे आणि एका अनुभवी मॅच फिनिशरची कमी भारतीय संघाला जाणवली.
चौथ्या सामन्यात भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादव संघात दोन महत्त्वाचे बदल करण्याची दाट शक्यता आहे. गोलंदाजी आणि फलंदाजी अशा दोनही क्षेत्रात १-१ बदल केला जाऊ शकतो असा अंदाज आहे.
दुखापतीमुळे काही सामन्यांना मुकलेला रिंकू सिंग आता पुन्हा तंदुरूस्त झाला आहे. त्याच्या समावेशाने संघाला अनुभवी मॅच फिनिशर मिळेल. तसेच फारशी चांगली कामगिरी न करणारा ध्रुव जुरेल याला संघातून वगळण्यात येईल.
दुसरा बदल हा गोलंदाजीत केला जाण्याची शक्यता आहे. मोहम्मद शमीला संधी देताना अर्शदीपला विश्रांती देण्यात आली होती. या सामन्यात शमी आणि अर्शदीप दोघेही एकत्र दिसू शकतील. तर वॉशिंग्टन सुंदरला बाहेर ठेवण्यात येऊ शकेल.