राजकोट कसोटी सामन्यात यजमान भारताने ४३४ धावांनी मोठा विजय मिळवला. सध्या भारत आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिकेचा थरार रंगला आहे. तिसरा सामना जिंकून रोहितसेनेने २-१ अशी आघाडी घेतली आहे.
भारतीय संघाचा अनुभवी फिरकी गोलंदाज रवीचंद्रन अश्विनसाठी राजकोटचा सामना खूप खास राहिला. या सामन्यात त्याने आपल्या कसोटी कारकिर्दीतील ५०० बळी पूर्ण केले. जॅक क्रॉलीला बाद करताच अश्विनने ऐतिहासिक कामगिरी केली.
मात्र, या सामन्याच्या मध्यातच कौटुंबिक कारणास्तव अश्विनला संघ सोडून घरी जावे लागले. पण देशसेवेच्या भावनेने अश्विनने एका दिवसात पुनरागमन करून संघात प्रवेश केला.
अश्विनने ५०० कसोटी बळी पूर्ण केल्यानंतर त्याची पत्नी प्रीती नारायणन हिने एक भावनिक पोस्ट केली आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर अश्विनचा फोटो पोस्ट करत प्रीती भावूक झाली झाली.
ती म्हणाली, 'हैदराबादमधील पहिल्या कसोटी सामन्यात तो ५०० बळी पूर्ण करेल असे आम्हाला अपेक्षित होते. मात्र तसे झाले नाही. दुसऱ्या सामन्यात देखील त्याला यश आले नाही. त्याने ४९९ बळी पूर्ण केल्यानंतर मी भरपूर मिठाई विकत घेतली आणि घरी सर्वांना वाटली. पण त्याने ५०० बळी पूर्ण केल्यानंतर तो शांततेत घरी परतला.'
तसेच हे असे आजतागायत कधीच घडले नव्हते. ५०० ते ५०१ विकेट्स दरम्यान बरेच काही झाले. त्याने जरी ५०० बळी घेतले असले तरी हे आमच्या आयुष्यातील सर्वात कठीण ४८ तास होते. किती आश्चर्यकारक कामगिरी आहे. अश्विन, मला तुझा अभिमान आहे आणि आम्ही तुझ्यावर प्रेम करतो, असे प्रीतीने म्हटले.
दरम्यान, राजकोट कसोटीच्या तिसऱ्या दिवशी अश्विन मैदानात दिसला नाही. त्याची आई आजारी होती आणि म्हणूनच तो लगेच चेन्नईला गेला. मात्र, तो २४ तासांत संघात परतला आणि राजकोट कसोटीच्या चौथ्या दिवशी मैदानात दिसला.