इंग्लंडच्या ७ बाद २१५ धावांचा पाठलाग करताना भारताला १७ धावा कमी पडल्या. विराट कोहली, रोहित शर्मा व रिषभ पंत हे तिघेही ३१ धावांत माघारी परतल्यानंतर सूर्यकुमार यादवचे ( Suryakumar Yadav) वादळ घोंगावले. त्याने श्रेयस अय्यरसह चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी करताना अखेरपर्यंत संघर्ष केला. १९व्या षटकात सूर्यकुमारची विकेट मिळवण्यात इंग्लंडला यश आले अन् भारताने सामना गमावला.
इंग्लंडने डेवीड मलान ( ७७) व लिएम लिव्हिंगस्टोन ( ४२*) यांच्य दमदार खेळीच्या जोरावर भारतासमोर २१६ धावांचे लक्ष्य ठेवले. रवी बिश्नोई व हर्षल पटेल यांनी प्रत्येकी २ विकेट्स घेतल्या. प्रत्युत्तरात, रिषभ ( १), रोहित ( ११) व विराट ( ११) हे लगेच माघारी परतले.
सूर्यकुमार व श्रेयस यांनी डाव सावरला. या दोघांनी चौथ्या विकेटसाठी ११९ धावांची भागीदारी केली. भारताकडून ट्वेंटी-२०त चौथ्या विकेटसाठी ही सर्वोत्तम भागीदारी ठरली. यापूर्वी हा विक्रम लोकेश राहुल व महेंद्रसिंग धोनी ( १०७ वि. वेस्ट इंडिज, २०१६) यांच्या नावावर होता.
सूर्यकुमार ५५ चेंडूंत १४ चौकार व ६ षटकारांसह ११७ धावांवर माघारी परतला. भारताकडून ही ट्वेंटी-२०तील दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. रोहित शर्माने २०१७मध्ये श्रीलंकेविरुद्ध ११८ धावा केल्या होत्या. २०१८मध्ये रोहितने वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद १११ धावा केल्या होत्या.
भारताकडून ट्वेंटी-२०त शतक झळकावणारा सूर्यकुमार यादव हा पाचवा फलंदाज ठरला आणि चौथ्या क्रमांकावर लोकेश राहुलनंतरचा दुसरा फलंदाज. रोहित शर्मा, सुरेश रैना व दीपक हुडा यांनी शतकी खेळी केली आहे.
चौथ्या क्रमांकावर सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी करणाऱ्या फलंदाजांमध्ये सूर्यकुमारने ( ११७) ऑस्ट्रेलियाच्या ग्लेन मॅक्सवेलचा ११३* ( वि. भारत, २०१९) धावांचा विक्रम मोडला. तसेच भारताकडूनही ही चौथ्या क्रमांकाची सर्वोत्तम खेळी ठरली. लोकेशने २०१६ मध्ये विंडीजविरुद्ध नाबाद ११० धावा केल्या होत्या.
ट्वेंटी-२०त भारताच्या पराभवात सर्वोत्तम धावा करण्याचा विक्रमही सूर्यकुमारच्या नावावर नोंदवला गेला. यापूर्वी २०१६मध्ये लोकेश राहुलच्या नाबाद ११० धावांनंतरही भारताला पराभव पत्करावा लागला होता. आज भारताला २१६ धावांच्या लक्ष्याच्या प्रत्युत्तरात ९ बाद १९८ धावा करता आल्या.