IND vs BAN: मीरपूर येथे रविवारी बांगलादेश विरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात भारतीय संघाला १ विकेटने पराभव पत्करावा लागाल. या पराभवानंतर भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) भडकले आहेत. बांगलादेशसारख्या दुबळ्या संघाने भारताच्या तोंडचा घास हिसकावून घेतला आणि गावस्कर यांनी कर्णधार रोहित शर्माची शाळा भरवली.
सामन्यानंतर रोहित शर्मा म्हणाला, आमची फलंदाजी चांगली झाली नाही. गोलंदाजांनी त्यांच्याकडून चांगली कामगिरी केली. ते विकेट घेत होते. पण, ३०-४० धावा अधिक झाल्या असत्या तर निकाल वेगळा लागला असता. काही कारण देणार नाही. अशा खेळपट्टीवर कसे खेळायचे हे शिकायला हवे. आशा करतो की दुसऱ्या सान्यात आम्ही चांगली कामगिरी करू.
गावस्कर यांनी टीम इंडिया कर्णधार रोहित शर्मावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यात टीम इंडिया अवघ्या १८६ धावांत ऑलआऊट झाली आणि बांगलादेशने ४६ षटकांत १८७ धावांचे लक्ष्य गाठले. या पराभवानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आम्ही ३० ते ४० धावा कमी केल्या आणि त्यामुळे आम्ही सामना हरलो, असे सांगितले.
रोहित शर्माच्या या वक्तव्यावर सुनील गावस्कर संतापले. ते म्हणाले, ''टीम इंडियाने ३० ते ४० धावा नव्हे तर ७० ते ८० धावा कमी केल्या. टीम इंडियाने किमान २५० धावा करायला हव्या होत्या. टीम इंडियाने बांगलादेशच्या ९ विकेट्स १३६ धावांवर घेतल्या होत्या. मात्र शेवटच्या विकेटसाठी मेहिदी हसन मिराज आणि मुस्तफिजुर रहमान यांच्यात ५१ धावांची भागीदारी झाली.''
सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर गावस्कर म्हणाले, ''सामना तिथेच संपायला हवा होता. आमच्या गोलंदाजांनी चमकदार कामगिरी करत १३६ धावांत त्यांच्या ९ विकेट्स घेतल्या होत्या. मेहिदी हसन मिराजही नशीबवान ठरला आणि त्याचे झेल सुटले. पण टीम इंडियाने केवळ १८६ धावा केल्या होत्या, हे आपण विसरता कामा नये. भारताने ७०-८० धावा कमी केल्या होत्या. टीम इंडियाने २५० धावा केल्या असत्या तर सामन्याचा निकाल वेगळा लागला असता