WTC Final Qualification Scenario : स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत अडीच दिवसात भारतावर विजय मिळवण्याचा पराक्रम केला. पहिल्या दोन कसोटींत हार पत्करलेला ऑस्ट्रेलियाने जबरदस्त कमबॅक करताना ९ विकेट्सने इंदूर कसोटी जिंकून बॉर्डर गावस्कर ट्रॉफीत १-२ अशी पिछाडी कमी केली. भारताचे ७६ धावांचे लक्ष्य ऑसींनी सहज पार केले.
ऑस्ट्रेलियाने ही कसोटी जिंकून जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या ( WTC 2023) अंतिम फेरीतील जागा पक्की केली. ऑस्ट्रेलियाने ६८.५२ टक्क्यांसह जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.
भारतीय संघ ६०.२९ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानावर आहे, तर श्रीलंका ५३.३३ टक्क्यांसह व दक्षिण आफ्रिका ५२.३८ टक्क्यांसह चौथ्या स्थानावर आहे. त्यामुळे भारताची वाट बिकट झाली आहे. जागतिक कसोटी चॅम्पियनशिपचा अंतिम सामना ७ जूनपासून ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे.
इंदूर कसोटी सामना भारताच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचा होता. भारतीय संघाने हा सामना जिंकला असता, तर जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत ते प्रवेश केला असता. या सामन्यात पराभव झाल्यामुळे भारताची अंतिम फेरी गाठण्याची प्रतीक्षा थोडी वाढली आहे.
इंदूर कसोटीत पराभव झाल्यामुळे जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी भारताला अहमदाबाद कसोटी सामना कोणत्याही परिस्थितीत जिंकावा लागेल. ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली किंवा २-२ अशी बरोबरीत सुटली तर भारताला न्यूझीलंड-श्रीलंका मालिकेतील निकालावर अवलंबून राहावे लागेल.
अशा स्थितीत श्रीलंकेने न्यूझीलंडविरुद्धच्या दोन सामन्यांपैकी किमान एक तरी सामना हरावा, अशी प्रार्थना भारताला करावी लागेल. न्यूझीलंडसारख्या बलाढ्य संघाविरुद्ध, तेही मायदेशात जिंकणे श्रीलंकेसाठी खूप कठीण असेल.