IND SL T20 Series Hardik Pandya T20 Captain: सलग दोन वर्ल्ड कप स्पर्धांमध्ये अपयश आल्यानंतर BCCI ने २०२४ च्या वर्ल्ड कपच्या तयारीसाठी कंबर कसली आहे. त्यामुळेच आता नवा कर्णधार निवडण्याची प्रक्रिया सुरू झाली असून रोहित शर्मा, विराट कोहली, आर अश्विन यांना ट्वेंटी-२० संघापासून दूर ठेवण्यात येत आहे.
न्यूझीलंड दौऱ्यापासून त्याची सुरुवात झालीय आणि आगामी श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतही हेच चित्र दिसणार आहे. श्रीलंकेविरुद्ध जानेवारी २०२३ मध्ये भारतीय संघ तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. याही मालिकेत रोहित, विराट हे संघाचे सदस्य नसणार. ट्वेंटी-२० संघाच्या प्लानमधून या दोन्ही सीनियर खेळाडूंना वगळण्यात आलेले आहे.
आता ट्वेंटी-२० संघाचे नेतृत्व हार्दिक पांड्याकडे सोपवण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित आहे. BCCI ने रोहित, विराट, मोहम्मद शमी, आर अश्विन, दिनेश कार्तिक यांनाही तसे कळवले आहे. हार्दिककडे नेत्वृत्वाची जबाबदारी दिली जात असताना KL Rahul मात्र श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेलाही मुकणार आहे.
''नव्या निवड समितीची घोषणा डिसेंबरमध्ये केली जाईल. त्यामुळे भारतीय संघाबाबत ते निर्णय घेतली, परंतु काही नावांशिवाय आता पुढे जायला हवं. रोहित, विराट यांच्याशी बोलणं झालेलं आहे,''असे बीसीसीआयच्या सूत्रांनी InsideSport ला सांगितले.
२०११ मध्ये भारताने वन डे वर्ल्ड कप जिंकला होता आणि २०१३मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी... ICCच्या या दोन्ही स्पर्धा महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने जिंकल्या होत्या. त्यानंतर टीम इंडियाच्या वाट्याला आयसीसी ट्रॉफी आलीच नाही. लोकेश राहुल व रिषभ पंत हे ट्वेंटी-२० संघाचे भविष्याचे कर्णधार म्हणून शर्यतीत होते, परंतु हार्दिकने बाजी मारलेली दिसतेय. या शर्यतीत असलेला जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे त्रस्त आहे.
३५ वर्षीय रोहित वन डे वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत टीम इंडियाची धुरा सांभाळणआर आहे. ऑस्ट्रेलियात नुकत्याच पार पडलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत खेळलेले बरेच सीनियर खेळाडू २०२४ मध्ये वेस्ट इंडिज-अमेरिकेत होणाऱ्या स्पर्धेत खेळणार नाही.
लोकेश राहुल जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अभिनेत्री अथिया शेट्टी हिच्याशी लग्न करणार असल्याची चर्चा आहे आणि त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेलाही मुकणार आहे.