Join us  

...तर युवराज सिंगच्या नावावर सहा वर्ल्ड कप असायला हवेत; MS Dhoniच्या विजयी षटकारावर गौतम गंभीरचा चिमटा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 02, 2021 2:09 PM

Open in App
1 / 6

२०११चा वन डे वर्ल्ड कप आठवला की आपल्या डोळ्यासमोर कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा ( the six MS Dhoni hit in the final against Sri Lanka ) विजयी षटकार उभा राहतो. धोनीच्या त्या षटकारानं टीम इंडियाला वर्ल्ड कप जिंकून दिला, असे अनेकांनी मत व्यक्त केलं. पण, गौतम गंभीरनं ( Gautam Gambhir) या मताचं खंडन केलं. हा विजय सर्वांच्या योगदानातून साकारला गेला आहे, असे स्पष्ट मत गंभीरनं व्यक्त केलं.

2 / 6

''एका व्यक्तीमुळे आपल्याला वर्ल्ड कप जिंकून दिला, असे तुम्हाला वाटतं का?, जर एक व्यक्ती वर्ल्ड कप जिंकू शकते, तर आतापर्यंत भारतानं सर्व वर्ल्ड कप जिंकले असते. दुर्दैवानं भारतात व्यक्तीपूजा केली जाते. माझा त्यावर विश्वास नाही. हा सांघिक खेळ आहे, इथे व्यक्तीला महत्त्व नाही. सर्वांच्या योगदानातून विजय साकारला जातो,''असे गंभीर म्हणाला.

3 / 6

गौतम गंभीरनं २०११च्या वर्ल्ड कपमधील झहीर खान, सचिन तेंडुलकर, युवराज सिंग आदी खेळाडूंच्या कामगिरीचेही कौतुक केलं. त्यामुळे जे कोणी धोनीच्या एका षटकाराला वर्ल्ड कप विजयाचे श्रेय देत असाल तर युवराज सिंगच्या नावावर सहा वर्ल्ड कप असायला हवेत, असेही गंभीर म्हणाला. २००७च्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत युवीनं इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार खेचले होते.

4 / 6

तुम्ही झहीर खानचं योगदान विसरलात?; अंतिम सामन्यातील त्याचा पहिला स्पेल आठवा. त्यानं सलग तीन निर्धाव षटकं फेकली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धची युवराज सिंगची फटकेबाजी विसरलात? दक्षिण आफ्रिकेविरुद्धचे सचिन तेंडुलकरचे शतकही विसरलात? मग आपण फक्त आणि फक्त तो एक षटकारच का लक्षात ठेवलाय?

5 / 6

जर एक षटकार वर्ल्ड कप जिंकून देऊ शकतो, तर मग युवराज सिंगनं भारतासाठी सहा वर्ल्ड कप जिंकायला हवेत. त्यानं एका षटकात सहा षटकार खेचलेत. त्याबद्दल कुणीच बोलत नाही. २००७चा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि २०११चा वन डे वर्ल्ड कप स्पर्धेतील तो सामनावीर होता. तरीही आपण त्या एकच षटकाराबद्दल बोलतोय, असे गंभीर म्हणाला.

6 / 6

गौतम गंभीरनं अंतिम सामन्यात ९७ धावांची महत्त्वपूर्ण खेळी करून टीम इंडियाला सावरलं होतं. टीम इंडियाचे दोन्ही सलामीवीर ३२ धावांवर माघारी परतले होते. माहेला जयवर्धनेनं १०३ धावांची खेळी करताना श्रीलंकेला ६ बाद २७४ धावांचा पल्ला गाठून दिला. धोनीनं ७९ चेंडूंत नाबाद ९१ धावा चोपल्या. नुवान कुलसेकरानं टाकलेल्या ४९व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचला अन् एकच जल्लोष झाला.

टॅग्स :गौतम गंभीरमहेंद्रसिंग धोनीआयसीसीयुवराज सिंगसचिन तेंडुलकरविरेंद्र सेहवागझहीर खान