३ वर्षाची असताना वडिलांचं निधन, आई रोजंदारीवर १५०० रुपये कमवायची; रेणुका ठाकूरचा संघर्षमय प्रवास

भारतीय महिला संघाने पहिल्यांदाच क्रिकेट विश्वचषक जिंकला असून त्यामुळे देशभरात क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मुंबईतील डीवाय पाटील स्टेडियमवर झालेल्या फायनल सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला.

महिला संघातील प्रत्येक खेळाडूने टीमच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यातीलच एक म्हणजे हिमाचल प्रदेशातील शिमला येथील मुलगी रेणुका सिंह ठाकूर.. रेणुकाही या विजेत्या टीमचा एक भाग होती. तिने वेगवान गोलंदाज म्हणून तिचं कौशल्य सिद्ध केले आहे.

शिमलापासून सुमारे १०० किमी अंतरावर असलेल्या रोहरमधील पारसा गावातील रेणुका ठाकूरसाठी एका लहान गावातील मैदानातून आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये खेळणे हे एका आव्हानापेक्षा कमी नव्हते. तिच्या संघर्षाची कहाणी बरीच मोठी आहे. रेणुकाच्या वडीलांचे निधन ती फक्त तीन वर्षांची असताना झाले होते आणि तिची आई सुनीता यांना तिला आणि तिच्या भावाला सांभाळले.

रेणुका फक्त २-३ वर्षांची असताना तिने तिचे वडील गमावले, मात्र डोंगराएवढे दु:ख कोसळूनही धाडस दाखवत तिची आई सुनीता यांनी मुलीला मोठं केले. मुलीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कितीही अडचणींचा सामना करावा लागला तरी करेल असं तिच्या आईने ठरवले होते.

रेणुकाचे वडील केहर सिंग ठाकूर यांचे १९९९ मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनामुळे कुटुंबाला आधार हरवला. परंतु तिच्या आईने हार मानली नाही. त्यावेळी सुनीता ठाकूर आयपीएच विभागात रोजंदारीवर काम करत होत्या.

रेणुका यांच्या आईला महिन्याला फक्त १,५०० रुपये मिळत होते आणि त्या पैशाने त्यांना तिच्या दोन मुलांचे संगोपन करावे लागत होते, जे खूप कठीण होते. मात्र या परिस्थितीतून त्यांनी कधीच हार मानली नाही. त्याशिवाय मुलांनाही आर्थिक अडचणीबद्दल कळू दिले नाही.

रेणुकाच्या आईला फक्त १५०० रूपये मिळायचे, पण रेणुकाच्या फक्त बुटांची किंमत १५,००० रुपये होती, पण तिला काहीही कमी पडू दिले नाही असं तिची आई सांगते. आम्ही स्वतः गरिबीत जगलो, अगदी कोरड्या भाकरीवरही जगलो असं सुनीता ठाकूर यांनी सांगितले.

आर्थिक संकट इतके गंभीर होते की अनेक वेळा रेणुकाच्या आईला त्यांच्या विभागाच्या उपविभागीय अधिकाऱ्यांकडून पैसे उधार घेण्याची वेळ आली. त्याशिवाय सासरे आणि मेहुणे यांनीही त्यांना अनेक वेळा मदत केली असं त्यांनी म्हटलं.

पारसा गावात राहणारी रेणुका फक्त ३-४ वर्षांची असताना गावातील तिचा भाऊ विनोद आणि चुलत भावांसोबत कापडी चेंडू आणि लाकडी बॅट वापरून क्रिकेट खेळायची. रेणुकाचे काका भूपिंदर ठाकूर यांनी तिचं कौशल्य सर्वात आधी ओळखले.

भूपिंदर ठाकूर यांनी रेणुकाला खेळताना पाहिले तेव्हा त्यांनी तिला गोलंदाजी करण्यास सांगितले. रेणुकाने जसं तिच्या काकाला बॉलिंग केली, तेव्हा तेदेखील हैराण झाले. त्यानंतर त्यांनी तिला धर्मशाळा क्रिकेट अकादमीत घेऊन गेले. तिथून रेणुका ठाकूरने मागे वळून पाहिले नाही.