ICC Women's Under-19 T20 World Cup Final : भारतीय संघाने पहिला वहिला १९ वर्षांखालील मुलींचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने इंग्लंडचा संपूर्ण संघ ६८ धावांत गुंडाळला आणि त्यानंतर ७ विकेट्स राखून सामना जिंकला.
भारतीय महिलांनी पहिली वहिली आयसीसी स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी मुलींना अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर विजयाच्या जल्लोष करण्याचे निमंत्रण दिले अन् संघाला ५ कोटींच्या बक्षीस रकमेची घोषणा केली.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारताने पहिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला होता आणि आज शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली १९ वर्षांखालील पोरींनी तसाच पराक्रम केला. आयसीसी स्पर्धा जिंकणारा हा आशियातील महिलांचा पहिला संघ ठरला.
शेफाली वर्माच्या नेतृत्वाखाली भारताच्या १९ वर्षांखालील मुलींनी वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. गोलंदाजी, क्षेत्ररक्षणात चमकदार खेळ करताना भारताच्या पोरींनी इंग्लंडची घसरगुंडी उडवली. तितास संधू, अर्चना देवी व पार्श्वी चोप्रा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेत इंग्लंडच्या मुलींच्या संघाची वाईट अवस्था केली. इंग्लंडचा संघ ६८ धावांत तंबूत परतला.
ICC स्पर्धेच्या फायनलमधील सर्वबाद ६८ ही सर्वात निचांक खेळी ठरली. यापूर्वी २००६मध्ये १९ वर्षांखालील मुलांच्या वर्ल्ड कप फायनलमध्ये पाकिस्तानने ७१ धावांवर भारताचा डाव गुंडाळला होता.
प्रत्युत्तरात भारतीय संघालाही २० धावांत दोन धक्के बसले. कर्णधार शेफाली वर्मा १५ धावांवर, तर श्वेता सेहरावत ५ धावांवर बाद झाल्या. सौम्या तिवारी ( २४) आणि गोंगडी त्रिशा ( २४) या जोडीने भारताचा डाव सावरला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकून इतिहास घडवला.
श्वेताने या स्पर्धेत सर्वाधिक २९७ धावा केल्या आहेत आणि नाबाद ९२ ही त्याची सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरली. शेफालीनेही ७ सामन्यांत १७२ धावा केल्या. गोलंदाजीत पार्श्वी चोप्राने भारताकडून सर्वाधिक ११ विकेट्स घेतल्या आहेत.
या सामन्यानंतर कर्णधार शेफाली ढसाढसा रडताना दिसली. २०२०मध्ये मेलबर्नवर ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारताच्या वरिष्ठ महिला संघाला पराभवाचा धक्का बसला होता अन् त्या संघाची शेफाली सदस्य होती. तेव्हाही ती रडली होती. पण, आज वर्ल्ड कप जिंकल्यावर तिच्या डोळ्यातील अश्रू हे आनंदाचे होते.
वन डे वर्ल्ड कप, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, १९ वर्षांखाली मुलांचा व मुलींचा वर्ल्ड कप जिंकणारा भारत हा जगातील एकमेव संघ ठरला आहे.