Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुस्तफिजूर वाद पेटला! बांगलादेश भारताबाहेर खेळण्यासाठी अडून बसला; BCCI ला करोडोंचा फटका...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2026 14:03 IST

Open in App
1 / 9

क्रिकेट विश्वात सध्या भारत आणि बांगलादेश क्रिकेट बोर्डातील तणाव शिगेला पोहोचला आहे. आयपीएलमधील कोलकाता नाईट रायडर्सचा वेगवान गोलंदाज मुस्तफिजूर रहमान याला बीसीसीआयने खेळण्यापासून रोखल्याचा आरोप करत, आता बांगलादेशने २०२६ च्या टी-20 विश्वचषकातील आपले सर्व सामने भारताबाहेर हलवण्याची मागणी केली आहे.

2 / 9

या निर्णयामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (BCCI) कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. बीसीसीआयला सात ते ३० कोटी रुपयांचा फटका बसण्याचा अंदाज वर्तविला जात आहे. परंतू, एकंदरीत बीसीसीआयच्या उत्पन्नाचा आवाका पाहता ही रक्कम एकदम चिल्लर आहे.

3 / 9

मुस्तफिजूर रहमानला आयपीएलमधून बाहेर काढल्यानंतर बांगलादेशच्या क्रीडा मंत्र्यांनी तीव्र संताप व्यक्त केला होता. 'आम्ही आमच्या खेळाडूंचा अपमान सहन करणार नाही,' असे म्हणत त्यांनी बांगलादेशच्या संघाला विश्वचषकासाठी भारतात पाठवण्यास नकार दिला आहे. हे सामने सह-यजमान असलेल्या श्रीलंकेत खेळवण्यात यावेत, अशी अधिकृत मागणी त्यांनी आयसीसीकडे (ICC) केली आहे.

4 / 9

जर आयसीसीने ही मागणी मान्य केली, तर बीसीसीआयच्या उत्पन्नावर थेट परिणाम होईल. कारण आयसीसी स्पर्धांमधून तिकिटे, प्रसारण आणि केंद्रीय प्रायोजकत्व महसूल थेट बीसीसीआयकडे जात नाही. तर मैदानावरील स्थानिक जाहिराती, तिकीटे घेणाऱ्या प्रेक्षकांना दिल्या जाणाऱ्या खानपानाच्या सेवेतून मिळणारा महसूल आदी उत्पन्नच बीसीसीआयला मिळतो.

5 / 9

मुळात पहिल्या फेरीत बांगलादेशचे वेस्ट इंडिज, इटली आणि इंग्लंडविरुद्ध तीन सामने कोलकात्याच्या ईडन गार्डन्सवर आणि एक सामना नेपाळविरोधात मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर होणार आहेत. या सामन्यांतून केवळ इग्लंडच्या सामन्यातून बीसीसीआयला या हॉस्पिटॅलिटीमधून उत्पन्न मिळण्याची आशा होती. इतर सामन्यांना सध्याचा तणाव पाहता बांगलादेशचा खेळ पाहण्यासाठी प्रेक्षक येणे खूप कठीण जाणार आहे.

6 / 9

इंग्लंडचा सामना श्रीलंकेत गेला तर या सामन्यांमुळे हॉटेल, पर्यटन आणि स्थानिक ब्रँड्सना मिळणारा फायदा कमी होईल. जरी आयसीसीचे मुख्य प्रसारण उत्पन्न सुरक्षित असले, तरी स्थानिक पातळीवरील व्यावसायिक उपक्रम प्रभावित होतील. हा तोटा तिकीटविक्रीनुसार सात ते ३० कोटी एवढा अंदाजे काढण्यात आला आहे.

7 / 9

ईडन गार्डन्सची क्षमता ६३,००० तर वानखेडेची ३३,००० आहे. एकूण ४ सामन्यांसाठी मिळून सुमारे २.२ लाख तिकीट विक्रीचा अंदाज होता. जर हे सामने रिक्त राहिले किंवा दुसऱ्या कमी लोकप्रिय संघांच्या सामन्यांनी बदलले, तर बीसीसीआयच्या 'मॅच-डे' रिव्हेन्यूमध्ये मोठी घट होईल.

8 / 9

बीसीसीआयने अद्याप यावर अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही, मात्र सूत्रांच्या मते, विश्वचषकासारख्या मोठ्या स्पर्धेचे वेळापत्रक अवघ्या महिनाभर आधी बदलणे अत्यंत कठीण आहे. अचानक सर्व बुकिंग बदलणे, नवीन मिळविणे आणि त्याप्रमाणे शेड्यूल करणे कठीण आहे.

9 / 9

यापूर्वी पाकिस्तानचे सामने हायब्रीड मॉडेलनुसार श्रीलंकेत खेळवण्यात आले होते. आता बांगलादेशनेही त्याच धर्तीवर मागणी केली आहे. मात्र, तज्ज्ञांच्या मते, यामुळे भविष्यातील क्रिकेट स्पर्धांमध्ये चुकीचा पायंडा पडू शकतो. आता जय शाह यांच्या नेतृत्वाखालील आयसीसी या प्रकरणावर काय तोडगा काढते, याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :भारत विरुद्ध बांगलादेशबांगलादेशपाकिस्तानट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026बीसीसीआय