या संपूर्ण प्रकरणाची सुरुवात बांगलादेशच्या संघापासून झाली होती. बांगलादेशने सुरक्षेच्या कारणास्तव भारतात खेळण्यास नकार दिला होता. त्यानंतर पाकिस्ताननेही बांगलादेशची बाजू घेत या वादात उडी घेतली. मात्र आयसीसीने बांगलादेशच्या दाव्यांना केराची टोपली दाखवत बांगलादेशला स्पर्धेतून बाहेरची वाट दाखवली. त्यानंतर पाकिस्तानने आणखी एक चाल खेळली. तसेच आपण विश्वचषक स्पर्धेत खेळू मात्र बांगलादेशला पाठिंबा म्हणून भारताविरुद्ध खेळणार नाही, अशी भूमिका घेतली. तसेच बांगलादेशला या स्पर्धेसाठीचा पूर्ण निधी मिळावा, द्विपक्षीय मालिका व्हाव्यात यासह अनेक मागण्या केल्या. दरम्यान, पाकिस्तान सरकारनेही अधिकृतपणे या सामन्यातून माघार घेण्याचे जाहीर करून टाकले होते.