भारतीय संघाचे टी-२० विश्वचषकातील अभियान नामिबियाविरुद्धच्या विजयाबरोबरच संपुष्टात आले. भारतीय संघ उपांत्य फेरीत प्रवेश करू शकला नाही.
सुरुवातीच्या दोन सामन्यात पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून झालेल्या दारुण पराभवांमुळे भारतीय संघ अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबियाविरुद्ध मोठे विजय मिळवूनही उपांत्य फेरी गाठू शकला नाही.
स्पर्धेतील सुमार कामगिरीमुळे भारतीय संघाला टिकेचा सामना करावा लागला आहे. दरम्यान, नामिबियाविरुद्ध झालेला सामान हा विराट कोहलीचा कर्णधार म्हणून शेवटचा सामना ठरला.
एक कर्णधार म्हणूनही विराट कोहली आपल्या शेवटच्या स्पर्धेला अविस्मरणीय बनवू शकला नाही. स्पर्धेतून बाहेर पडताच विराट कोहलीने सोशल मीडियावर एक भावूक संदेश लिहिला आहे.
यात तो म्हणतो की, आम्ही एकत्र आपले लक्ष्य गाठण्यासाठी निघालो होतो. मात्र दुर्दैवाने आम्ही थोडे मागे राहिलो. आमच्यापेक्षा अधिक निराश कुणी नाही आहे.
तुम्हा सर्वांचा पाठिंबा चांगला राहिला आहे. तसेच आम्ही त्यासाठी आभारी आहोत. अधिक भक्कमपणे पुनरागमन करण्याचे आमचे लक्ष्य आहे. त्यासाठी आम्हाला सर्वोत्तम कामगिरी करावी लागेल.
शेवटच्या साखळी सामन्यात भारताने नामिबियावर ९ विकेट्सनी मात केली होती. मात्र हा सामना केवळ औपचारिकताच होता.