बांगलादेशने विजयासाठी ठेवलेल्या २५७ धावांचा पाठलाग करताना विराट व लोकेश राहुल यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर आणले. भारताला विजयासाठी २६ धावांची गरज होती आणि विराटला शतकासाठी तेवढ्याच धावा हव्या होत्या. मग काय घडलं ते पाहूया...
३८ वे षटक संपले तेव्हा विराट ७३ आणि लोकेश ३३ धावांवर खेळत होते आणि भारताला विजयासाठी २८ धावा करायच्या होत्या. ३९व्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर विराटने एक धाव घेतली आणि त्यानंतर लोकेशने एक धाव घेत विराटला पुन्हा स्ट्राईक दिली. दोन निर्धाव चेंडूनंतर विराटने सिक्स खेचला आणि १ धाव घेत पुढच्या षटकात स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. आता विराट ८१ धावांवर पोहोचला होता आणि भारताला १९ धावा हव्या होत्या.
४०व्या षटकाचा पहिला चेंडू विराटने चौकार खेचला. दोन निर्धाव चेंडूनंतर षटकार अन् पुन्हा एक डॉट बॉल... शेवटच्या चेंडूवर १ धाव घेत पुढील षटकात स्ट्राईक स्वतःकडे ठेवली. यावेळी लोकेश राहुलही विराटला उगाच एक धाव घेऊन मला स्ट्राईक देऊ नको असे सांगत होता. त्याने विराटला शतक पूर्ण करण्यास सांगितले.
४१व्या षटकात हसन महमूदने वाईड चेंडू टाकल्याने विराटने गणित बिघडले. त्यानंतर त्याने २,०,२,०,१ अशा घावा काढल्या. ४२ व्या षटकात नसूमने वाईड फेकला होता, परंतु अम्पायरने तो दिला नाही. विराटला शतकासाठी ३ आणि विजयासाठी २ धावा हव्या होत्या.
विराटने खणखणीत षटकार खेचून भारताच्या विजयासोबत शतकही पूर्ण केले. भारताने ४१.३ षटकांत ३ बाद २६१ धावा करून विजय पक्का केला. विराटने ९७ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या. लोकेश राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला.
लिटन दास ( ६६), तनझीद हसन ( ५१), महमुदुल्लाह ( ४६) व मुश्फिकर रहिम ( ३८) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर बांगलादेशने ८ बाद २५६ धावा केल्या. लिटन दास व तनझीद यांनी ९३ धावांची सलामी दिली होती, परंतु भारतीय गोलंदाजांनी चांगले पुनरागमन केले. जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. कुलदीप यादव व शार्दूल ठाकूर यांनी प्रत्येकी १ बळी टिपला.
लक्ष्याचा पाठलाग करताना रोहित शर्मा व शुबमन गिल यांनी ८८ धावांची भागीदारी केली. रोहित ४८ धावांवर, तर शुबमन ५३ धावांवर बाद झाला. विराटने ९७ चेंडूंत ६ चौकार व ४ षटकारांच्या मदतीने नाबाद १०३ धावा केल्या. लोकेश राहुल ३४ धावांवर नाबाद राहिला, तर श्रेयस अय्यर १९ धावांवर बाद झाला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकला.
विराटचे हे वन डे क्रिकेटमधील ४८ वे शतक ठरले . याचसोबत त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद २६ हजार धावांचा वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. विराट ने ५७७ इनिंग्जमध्ये हा पल्ला पार करून सचिन तेंडुलकरचा ( ६०१ इनिंग्ज) वर्ल्ड रेकॉर्ड मोडला.